ग्रुप बी मध्ये चारही संघ एक-एक सामना जिंकल्यामुळे अंतिम चारमध्ये जाण्यासाठी चारही संघांचे पुढचे सामने करो वा मरो असेच असतील. पाकिस्तानविरुद्धचा सहज विजय भारताने जणू काही हलका घेतला आणि कमकुवत वाटणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आरामात खेळणाऱ्या भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. कालच्या सामन्यात जिकडे आठव्या क्रमांकाच्या पाकिस्तान संघाने आय. सी. सी. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत केले आज तर सातव्या क्रमांकाच्या श्रीलंका संघाने गतविजेत्या भारताचा धुव्वा उडवत मोठा उलटफेर केला. रविवारी होणारा भारत वि. दक्षिण आफ्रिका हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णयात्मकच असेल. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फॉर्मात असलेली शिखर धवन – रोहित शर्मा जोडीने आजची आपली छाप सोडत आणखी एक १०० धावांची भागीदारी करीत भारताला भक्कम सुरुवात करून दिली. स्पर्धेच्या इतिहासात या दोघांची ही चौथी १०० धावांची भागीदारी आहे. २५ व्या षटकात रोहित शर्मा (७८) बाद झाल्यानंतर शिखर धवनने आपल्या खेळत आक्रमकता आणत टीकाकारांना उत्तर देत दहावे एकदिवसीय शतक झळकावले. विराट कोहली (०) व युवराज सिंग (७) यांना चांगली खेळी करण्यात अपयश आल्यामुळे भारताला मध्ये ओव्हर्समध्ये हव्या तश्या धावा करता आल्या नाही. दरम्यान महेंद्र सिंग धोनीने ५२ चेंडूंचा सामना करीत सात चौकार व दोन षटकार ठोकत महत्वपूर्ण ६३ धावा केल्या तर केदार जाधवने शेवटी-शेवटी २५ धावांचं योगदान दिल्यामुळे भारताने ३०० धावांचा पल्ला गाठत लंकेला ३२२ धावांचं आव्हान दिलं. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पावसाने खो घातल्यामुळे बऱ्याच सामन्यांचा निकाल अपेक्षित लागला नाही. तसेच आजचा सामना श्रीलंकेसाठी कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक असल्यामुळे धावांचा पाठलाग हा आवश्यक धावगतीच्या बरोबरीने करणे खूपच महत्वाचे होते. भारतासारख्या अचूक गोलंदाजीपुढे एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करणे म्हणजे श्रीलंकेसाठी हिंदी महासागर पार करण्याइतके अवघड होते. पण क्रिकेटच्या खेळात काहीही अशक्य नसते हे दाखवून देत त्यांनी आपले आव्हान कायम ठेवले. भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकात यष्टीरक्षक निरोशान डिकवेलाला बाद करीत भारतासाठी चांगली सुरुवात केली. पण या सुरुवातीचा इतर भारतीय गोलंदाजांना फायदा न घेता आल्यामुळे श्रीलंकेने कोणताही दबाव न घेता धावांचा पल्ला आरामात गाठला. दुसऱ्या विकेटसाठी दनुष्का गुनाथिलका (७६) व कुशल मेंडिस (८९) यांनी जवळजवळ सातच्या सरासरीने १५९ धावांची भागीदारी करीत पाठलाग सोपा केला. श्रीलंकेला हव्या असलेल्या ६.४२ धावांचा पाठलाग या भागीदारीने देत भारतीय गोलंदाजांवर मोठा दबाव टाकला. तसे पाहता भारतीय गोलंदाजांना या दोन्ही खेळाडूंना बाद करण्यात अपयश आले. दोन्ही खेळाडू ठराविक अंतरावर धावबाद झाले आणि भारत पुन्हा एकदा सामन्यात वरचढ आला असे चित्र आले. मेंडिस बाद झाल्यानंतर श्रीलंकेला जिंकण्यासाठी १०४ चेंडूंत १२६ धावांची गरज होती. एक-दोन गडी जरी बार झाले असते तरी भारताने हा सामना कसाही जिंकला असता. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूसने मेंडिसनंतर सूत्रे आपल्या हाती घेत ४५ चेंडूंत ५२ धावांचं योगदान देत श्रीलंकेला ८ चेंडू शिल्लक ठेवत विजयश्री खेचून आणले. त्याला जखमी होऊन मैदानातून बाहेर जाण्याआधी कुसल परेरा (४७) व असेला गुणरत्ने (३४) यांची उत्तम साथ मिळाली. आजच्या या उलटफेरानंतर ब गटात आता पुढचे दोन्ही सामने हे क्वार्टर फायनलसारखेच असतील असेच म्हणता येईल. श्रीलंका वि. पाकिस्तान आणि भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजयी संघ हे उपांत्यफेरीत प्रवेश करतील. जर दोन्ही सामने पावसामुळे होऊ शकले नाही तर भारत व श्रीलंका अंतिम चारमध्ये प्रवेश करतील. संक्षिप्त धावफलक: भारत ३२१/६(५०) – धवन १२५(१२८), रोहित ७८(७९), धोनी ६३(५२) । मलिंगा २-७०(१०), गुणरत्ने १-७(३) श्रीलंका ३२२/३(४८.४) – मेंडिस ८९(९३), गुनाथिलका ७६(७२), मॅथ्यूस ५२(४५) । भुवनेश्वर १-५४(१०)]]>