जळगाव (सागर कुळकर्णी): राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, संर्पदंश, विंचूदेश, विजेचा शॉक बसणे इ. आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य शासन ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ राबविते. या योजनेचा कालावधी दि. १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. या कालावधीसाठी राज्यातील सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरण्यात आला असून रु. २ लाखाचा विमा उतरविण्यात आला आहे. या कालावधीत अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. या योजनेअंतर्गत विम्याचा लाभ मिळण्यासाठी १० ते ७५ वयोगटातील ७/१२ धारक शेतकरी असणे ही प्रमुख अट आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषि सहाय्यक किंवा कृषि पर्यवेक्षक किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. विमा प्रस्ताव सादर करण्याची पध्दती: शेतकरी / वारसदाराने तालुका कृषि अधिकारी कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तदनंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवतात. या योजने अंतर्गत विमा रक्कम मिळविणेसाठी कृषि विभागाकडून सहाय्य करण्यात येते. सदरचा प्रस्ताव या योजनेच्या कामकामाजासाठी व सल्ल्यासाठी शासनाने नेमलेले अधिकृत विमा सल्लागार जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर यांचेकडे पाठविण्यात येतो. सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३५३३ असा आहे. परिपूर्ण विमा प्रसव विमा कंपनी कडून मंजूर करुन घेणेसाठी कृषि विभागाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जात असल्याने त्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्ती, मध्यस्थ, दलाल इत्यादींचे सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही. शेतकरी व वारसदारांनी खाजगी व्यक्तिंशी संपर्क न साधता थेट कृषि विभाग किंवा अधिकृत ब्रोकर जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर यांचेशी संपर्क साधावा. यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील विमा संरक्षणामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- १. रस्ता / रेल्वे अपघात २. पाण्यात बुडून मृत्यू ३. जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा ४. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात ५. वीज पडून मृत्यू ६. खून ७. उंचावरुन पडून झालेला अपघात ८. सर्पदंश व विचुदंश ९. नक्षली हल्ल्यात झालेल्या हत्या १०. जनावरांच्या खाल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू ११. दंगल १२. अन्य कोणतेही अपघात विमा संरक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या बाबी- १. नैसर्गिक मृत्यू २. विमा कालावधी पुर्वीचे अपंगत्व ३. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे ४. गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लघंन करतांना झालेला अपघात ५. अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात ६. भ्रमिष्टपणा ७. बाळंतपणातील मृत्यू ८. शरीरातर्गत रक्तस्त्राव ९. मोटार शर्यतीतील अपघात १०. युध्द ११. सैन्यातील नोकरी १२. जवळच्या लाभधारकाकडून खून या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ : अपघाताची बाब नुकसान भरपाई १. अपघाती मृत्यू – रुपये २००,०००/- २. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाम होण – रुपये २००,०००/- ३. अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे – रुपये २००,०००/- ४. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे – रुपये १००,०००/-]]>