बंगळुरू: पहिल्या कसोटीत पुणे येथे झालेल्या दारुण पराभवाची चांगलीच परतफेड करीत विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ७५ धावांनी पराभूत करीत ४ सामान्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रविचंद्रन अश्विनच्या जादुई फिरकीसमोर पुन्हा एकदा कांगारूंनी नांगी टाकत भारताला विजयश्री खेचून आणले. आज चौथ्या दिवशी भारताने पहिल्याच सत्रात आपले उरलेले सहा गडी गमावत कांगारूंसमोर १८८ धावांचे माफक लक्ष्य दिले. काल नाबाद असलेले पुजारा व राहाणे यांनी आपली १०० धावांची भागीदारी पूर्ण केली आणि भारतीय प्रेक्षकांना एका मोठ्या धावसंख्येचे चित्र दाखवले. दोघेही खेळपट्टीवर जम धरले दिसताच स्टार्कने राहाणेला पायचीत पकडत भारतीय डावाला खिंडार पडण्यास सुरुवात केली. लगेच करुण नायरही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पुढच्याच षटकात हेझलवुडने पुजारा व अश्विनला बाद करीत भारताला पुन्हा बँकफूटवर आणले. उरलेले दोन्ही गडी बाद करीत ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या डावात २७४ वर बाद केले. १८८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने काहीशी आक्रमक सुरुवात केली परंतु पाचव्याच षटकात इशांत शर्माने रेनशॉला बाद करीत कांगारूंना पहिला धक्का दिला. पुढे नवव्या षटकात अश्विनने वॉर्नरला बाद करीत पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. उमेश यादवनेही टिच्चून गोलंदाजी करीत शॉन मार्श व कर्णधार स्मिथला बाद करीत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ७४ अशी केली. दरम्यान स्मिथने पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे मदत मागण्याच्या प्रयत्न केला आणि विराट कोहली त्याच्या या निर्णयावर चांगलाच भडकला. पंचांनी मध्यस्थी करीत प्रकरण जास्त वाढून दिले नाही. स्मिथही काहीही न बोलता पॅव्हेलियनकडे निघून गेला. अश्विनने आजची आपल्या फिरकीची किमया दाखवीत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. ऑस्ट्रेलियाने आपले शेवटचे सागा गडी केवळ ११ धावांच्या अंतरावर गमावले आणि ११२ धावांत बाद होत सामना ७५ धावांनी गमावला. याच विजयाबरोबर भारताने चार सामान्यांच्या मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली.]]>