आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल जळगाव, दि. ६ / सागर कुळकर्णी: नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारसंघात येणाऱ्या विभागातील पाचही जिल्ह्यात तात्काळ प्रभावासह आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी आज येथे दिले. भारत निवडणूक आयोगाने ४ जानेवारी रोजी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जळगाव उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दि.१० जानेवारी (मंगळवार) रोजी या निवडणूकीसाठी अधिसूचना जारी होईल. दि. १७ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. दि.१८ जानेवारीला अर्जांची छाननी होईल. दि.२० जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत असेल. निवडणूक दि. ३ फेब्रुवारी रोजी असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ ही असेल. मतमोजणी दि.६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक विभागाने आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल करा, त्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच समन्वय राखून काम करेल, असे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मनोहर चौधरी यांनी केले.]]>