कोची (17 डिसेंबर 2016): येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी हिरो इंडियन सुपर लीगच्या अंतिम सामन्यात केरळा ब्लास्टर्स आणि ऍटलेटीको डी कोलकता यांच्यात अंतिम सामना होत आहे. केरळाला स्थानिक प्रेक्षकांकडून मिळत असलेला पाठिंबा प्रचंड आहे. आता यजमान संघाने अंतिम फेरी गाठल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा केरळच्या जमेची बाजू असेल, इतिहास मात्र माजी विजेत्या ऍटलेटीको डी कोलकता संघाच्या बाजूने असेल. केरळाने घरच्या मैदानावर सहा सामने जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे. प्रेक्षकांच्या रूपाने 12व्या खेळाडूचे पाठबळ मिळाल्याची त्यांना कल्पना आहे. घरच्या मैदानावर त्यांनी निम्या सामन्यात एकही गोल पत्करलेला नाही. त्यांनी येथे केवळ चारच गोल स्वीकारले आहेत. यानंतरही कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालणार नाही याची प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांना जाणीव आहे. कॉप्पेल म्हणाले की, आमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल, कारण आम्ही घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असू. अर्थात प्रेक्षक खेळणार नाहीत. त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे आम्हाला सुरवातीलाच गोल मिळेल असे नाही किंवा प्रतिस्पर्ध्याचे गोल अडतील असेही नाही. ज्या संघाला करंडक जिंकायचा आहे त्यांना चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघ तीव्र चुरशीच्या निर्धाराने खेळतील याची मला खात्री आहे. कॉप्पेल यांना आधीच्या निकालांची जाणीव नक्कीच असेल. खास करून गेल्या मोसमात एफसी गोवा संघाला अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले. केरळाला पहिल्या मोसमातील पराभवाची भरपाई करण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा एटीकेविरुद्धच त्यांचा पराभव झाला होता. कॉप्पेल यांनी सांगितले की, हा नुसता सामना आहे. खेळ सुरू झाल्यानंतर बाहेर काय घडते याला महत्त्व नाही. कोचीतील भव्य स्टेडियम एटीकेसाठी नवे नाही. येथे दुर्मिळ विजय मिळविणारा संघ एटीके आहे. जेव्हीयर लारा याने दुसऱ्या सत्रात निर्णायक गोल केला होता. मार्की खेळाडू हेल्डर पोस्टीगा याला अशा वातावरणात खेळण्याची सवय आहे. प्रेक्षक कोणत्याही संघासाठी अवघड परिस्थिती निर्माण करतील याची त्याला कल्पना आहे. तो म्हणाला की, उद्या मला जोरदार वातावरणाची अपेक्षा आहे. आयएसएलमधील सर्वोत्तम माहोल येथे असतो. आम्ही येथे खेळलो तेव्हा केरळा संघ किती खडतर प्रतिस्पर्धी आहे याची आम्हाला कल्पना आली. एटीके हा आयएसएलमधील सर्वाधिक सातत्य राखलेला एक संघ आहे. त्यांनी केवळ दोन सामने गमावले आहेत. मुंबई सिटी एफसीविरुद्ध उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्याच्या सामन्यात प्रशिक्षक होजे मॉलीना यांनी तब्बल नऊ बदल केले. त्यानंतरही संघ प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस ठरला. यामुळे एटीकेचे खेळाडू अंतिम सामन्यासाठी जास्त ताजेतवाने राहिले आहेत. मॉलीना यांनी सांगितले की, आम्ही सर्वाधिक सातत्य राखले का याची कल्पना नाही. आम्ही केवळ दोन सामने गमावले हे खरे आहे, पण मला सर्व संघांविषयी आदर वाटतो. केरळासाठी हा मोसम चांगला ठरला आहे, पण आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला करंडक हवा आहे. एटीकेने कोलकत्याबाहेर बाद फेरीचा चार पैकी एकच सामना जिंकला आहे. 2014च्या अंतिम सामन्यात त्यांनी बाजी मारली. मुंबईत केरळाविरुद्धच ते जिंकले. रविवारी यजमान संघासाठी भरघोस पाठिंबा असला तरी अशा निकालाची पुनरावृत्ती करण्याची त्यांना आशा आहे.]]>