खोपोली(मोहन आरमान)– खोपोली नगर परिषदेच्या शहर परिवहन सेवेचे हस्तांतरण खासगी ठेकेदाराला करण्याप्रकरणी झालेल्या घोटाळ्याकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घालण्यात आल्याने खोपोलीत खळबळ माजली आहे. पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वाघमारे यांनी खोपोली नगर परिषदेच्या शहर परिवहन सेवेचे खासगीकरण करुन ही सेवा खासगी ठेकेदाराला देताना किती अनियमितता केली गेली व नगर परिषदेचे किती व कसे नुकसान करण्यात आले याची माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती घेतली. या माहितीच्या आधारे शासकीय स्तरावर तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी रायगड यांच्या न्यायपीठासमोर या प्रकरणी अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरू असून तारीखपे तारीखच्या चक्रात ही सुनावणी अडकली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल वाघमारे यांनी सामाजिक कार्यकर्ते विकास नाईक- खुरपडे यांच्यासोबत ज्येष्ठ समाजसेवक तथा भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना शहर परिवहन सेवा खासगीकरण घोटाळ्याची पुराव्यासह माहिती दिली. अण्णा हजारे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आल्याने या प्रकरणात गुंतलेल्या मंडळीचे धाबे दणाणले आहे.]]>