कोलकता, दिनांक 10 डिसेंबर 2016: इयान ह्यूम याच्या दोन गोलांच्या बळावर माजी विजेत्या ऍटलेटिको द कोलकता संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात महत्त्वपूर्ण विजय मिळविला. त्यांनी घरच्या मैदानावर “टेन मेन’ मुंबई सिटी एफसीवर 3-2 अशी मात केली. उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामना शनिवारी येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर झाला. कोलकताने सामना जिंकला असला, तरी पाहुण्या मुंबई सिटीला दोन “अवे’ गोलांचा लाभ मिळाला आहे. सामन्यातील सर्व गोल पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात झाले. कोलकताने पूर्वार्धात पिछाडीवरून मुसंडी मारली आणि विश्रांतीला यजमान संघ 3-2 अशा आघाडीसह ड्रेसिंग रूममध्ये परतला. सामन्याच्या शेवटच्या सोळा मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांचा हुकमी खेळाडू आणि कर्णधार दिएगो फॉर्लान याला रेड कार्ड मिळाले. फॉर्लानला पहिले यलो कार्ड 51व्या, तर दुसरे यलो कार्ड 74व्या मिनिटाला मिळाले, त्यामुळे उरुग्वेच्या या खेळाडूस मैदान सोडावे लागले. पिछाडीवर पडलेल्या मुंबई सिटीसाठी हा मोठा झटकाच ठरला. कोलकत्याच्या ज्वेल राजा शेख याला लाथ मारल्यामुळे रेफरींनी फॉर्लानला दुसऱ्या वेळेस यलो कार्ड दाखविले. फॉर्लान आता उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीस मुकेल. मुंबईत दुसऱ्या टप्प्यातील लढतीत 13 डिसेंबरला खेळताना कोलकतापाशी एका गोलची आघाडी असेल. कोलकत्याने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला लालरिनडिका राल्टे याच्या हेडरमुळे आघाडी घेतली, पण नंतर मुंबई सिटीने मुसंडी मारत कोलकत्याला मागे टाकले. लिओ कॉस्ता याने दहाव्या, तर जेर्सन व्हिएरा याने 19व्या मिनिटाला गोल केल्यामुळे पाहुणा संघ 2-1 असा आघाडीवर आला. मात्र नंतर कॅनडियन इयान ह्यूमच्या चमकदार खेळामुळे यजमानांचे पारडे जड झाले. ह्यूमने 39व्या मिनिटाला संघाला बरोबरी साधून दिली आणि नंतर 45व्या मिनिटाला अचूक पेनल्टी फटक्यावर आघाडीचा गोल नोंदविला. त्याचे आता यंदाच्या स्पर्धेत सात गोल झाले आहेत. सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये ह्यूमला हॅटट्रिक नोंदविणे शक्य होते, पण त्याचा फटका दिशाहीन ठरला. सामन्यास नुकतीच सुरवात झालेली असताना लालरिनडिका राल्टे याने पाहुण्यांना झटका दिला. कर्णधार बोर्जा हर्नांडेझ याच्या क्रॉस फटक्यावर लालरिनडिका याने उडी घेत चेंडूला गोलजाळीच्या कोपऱ्यात दिशा दाखविली. यावेळी मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग साफ चकला आणि त्याला चेंडू रोखणे अजिबात शक्य झाले नाही. मुंबई सिटीस बरोबरी साधण्यास जास्त वेळ लागला नाही. जेर्सन व्हिएरास अडथळा आणल्यानंतर मिळालेल्या फ्रीकिक फटक्यावर लिओ कॉस्ता याने अप्रतिम फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा बचाव भेदला. मुंबई सिटीने नऊ मिनिटानंतर आणखी एक गोल केला. यावेळी फॉर्लानचेचे “असिस्ट’ होते, पण गोल करणारा जेर्सन व्हिएरा होता. फॉर्लानच्या फ्रीकिकवर व्हिएराचा हेडर गोलरक्षक डानी मालो याच्यासाठी अडविणे कठीणच ठरला. पिछाडीनंतर कोलकताने आक्रमक खेळ करत सामन्याचे पारडे फिरविले. लालरिनडिका राल्टे याने मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक अमरिंदर सिंगने चेंडू अडविला, परंतु त्यावर ताबा न राखता आल्याने कोलकत्याच्या सामीग दौती याला चेंडूवर नियंत्रण मिळविता आले. दौतीने ह्यूमला गोल करण्याची सुरेख संधी प्राप्त करून दिली. “आयएसएल’मध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या या अनुभवी खेळाडूने अचूक नेम साधला. पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास ह्यूमने पुन्हा अचूक फटका मारला, यावेळी त्याने पेनल्टी फटक्यावर चेंडूला योग्य दिशा दाखविली.]]>