कोलकता, दिनांक 9 डिसेंबर 2016: अॅटलेटीको डी कोलकता आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात येथील रबिंद्र सरोवर स्टेडियमवर शनिवारी हिरो इंडियन सुपर लिगच्या उपांत्य फेरीतील पहिव्या टप्याचा सामना होत आहे. अंतिम फेरी गाठण्याच्यादृष्टिने सुरवातीला आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ आतूर असतील. ही लढत सुरु होईल तेव्हा आधीचे निकाल आणि फॉर्मला काहीही महत्त्व राहिलेले नसेल. दोन्ही संघ एकमेकांना पकड मिळू नये म्हणून प्रयत्नशील राहतील. पहिला गोल करण्याला महत्त्व असेल. मुंबईने 14 पैकी आठ सामन्यांत पहिल्यांदा गोल केला आहे. यात एकदाही त्यांचा पराभव झाला नाही. त्यांनी यातील सहा सामने जिंकले. याचप्रमाणे एटीकेने सुद्धा पहिला गोल केल्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. आघाडी गमावल्यानंतर एटीकेला एकच विजय मिळविता आला आहे. एटीकेचे प्रशिक्षक होजे मॉलीना म्हणाले की, आमची मुंबईविरुद्ध आणखी एक लढत होत आहे. साखळीत आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ केला. माझा संघ जिंकू शकेल असा विश्वास वाटतो. मुंबईच्या स्ट्रायकर्सना रोखण्यासाठी आम्हाला बचावात चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचवेळी आम्हाला गोल नोंदविण्यासाठी उत्तम खेळ सुद्धा करावा लागेल. घरच्या मैदानावरील एटीकेची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना सात पैकी एकच सामना जिंकता आला आहे. साखळीतील आठ सामने बरोबरीत सुटणे हे सुद्धा टीकेचे कारण ठरले आहे. मॉलीना यांनी अंतिम फेरीतील स्थान पणास असल्याने संघ जिंकण्यासाठी खेळणे कायम ठेवेल अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की, आम्ही बरोबरीसाठी कधीच खेळलो नाही. आम्ही नेहमीच प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळतो. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आम्ही जिंकू शकलो नाही तर किमान बरोबरीसाठी प्रयत्न करू. आम्हाला पराभूत होणे परवडणार नाही. मुंबईचा संघ कोलकत्यात खेळला तेव्हा त्यांनी सहज विजय मिळविला. गुणतक्त्यात आघाडीवर असलेला हा संघ चौथ्या क्रमांकावरील एटीकेविरुद्ध खेळेल तेव्हा आधीचे निकाल आणि फॉर्मला काहीच महत्त्व नसेल असे मॉलीना यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मुंबई गुणतक्त्यात आघाडीवर आहे आणि आम्ही चौथे आहोत. यामुळे मुंबईचे पारडे जड असल्याचे लोकांना कदाचित वाटेल, पण त्यामुळे फरक पडणार नाही. मुंबई सिटी एफसीने साखळीत सर्वोत्तम फॉर्म राखत अव्वल स्थान मिळविले. या लढतीत त्यांचे पारडे जड असल्याचे अनेकांना वाटते. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस हे मात्र या लढतीकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. कोस्टारीकाचे असलेले हे प्रशिक्षक म्हणाले की, आम्ही उपांत्य फेरीत प्रथमच खेळत आहोत, तर एटीकेने यापूर्वीच दोन वेळा भाग घेतला आहे. आम्ही पहिला उपांत्य सामना खेळण्यासाठी आतूर आहोत. संपूर्ण स्पर्धेत केला तसा चांगला खेळ करण्याची आमची इच्छा आहे. आमच्याप्रमाणेच अत्यंत आक्रमक खेळू शकणाऱ्या संघाविरुद्ध आमची लढत असल्याची कल्पना आहे. त्यामुळे या फेरीचा निकाल मुंबईत लागेल. मुंबईने स्पर्धेतील सर्वोत्तम बचाव प्रदर्शित केला आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ आठ गोल झाले आहेत. त्यांची आघाडी फळी सुद्धा कोणत्याही संघाला हेवा वाटावा अशी आहे. गुईमाराएस यांना संघाच्या ताकदीची जाणीव आहे. संघाची ओळख वेगळी असल्याचे त्यांना वाटते. त्यांनी सांगितले की, संपूर्ण स्पर्धेत आम्ही फार चांगले स्थैर्य राखू शकलो. यामुळे विश्वास वाटतो. खेळाडू एका कल्पनेचा अवलंब करतात आणि चांगल्या तसेच खराब काळात सुद्धा तशाच मानसिकतेने खेळतात याचा विश्वास वाटतो. एका पद्धतीच्या खेळाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ते एकत्र येतात. आमचा विश्वास यावर आधारीत आहे. आमच्या संघाची एक वेगळी ओळख आहे आणि ती कायम राखण्यासाठी आम्हाला खेळावे लागेल.]]>