मुंबई, दिनांक 3 डिसेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत मुंबई सिटी एफसीने अव्वल स्थान राखले आहे. त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली डायनॅमोजने गोलशून्य बरोबरी रोखले. सामना शनिवारी मुंबई फुटबॉल अरेनावर झाला. गोलशून्य बरोबरीमुळे दोन्ही संघांवर परिणाम झाला नाही. मुंबई सिटीचे 14 सामन्यानंतर 23 गुणांसह पहिला क्रमांक कायम राहिला, तर दिल्लीचे 14 लढतीतून 21 गुण झाले व त्यांनी दुसरे स्थान राखले. दोन्ही संघांनी अगोदरच उपांत्य फेरी गाठल्यामुळे आजच्या निकालास क्रमवारीच्या दृष्टीनेच महत्त्व होते. सामन्यात मुंबई सिटीने अधिकांश वर्चस्व राखले, परंतु त्यांना गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. अचूक नेमबाजी झाली असती, तर यजमानांना पूर्वार्धात किमान दोन गोलांची आघाडी घेणे शक्य होते. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीचा आणखी एक सुरेख प्रयत्न दिल्लीच्या दक्ष बचावामुळे विफल ठरला. त्यापूर्वी फटका क्रॉसबारला आपटल्याने दिल्लीलाही आघाडीचा गोल नोंदविणे शक्य झाले नाही. दिल्लीने आजच्या लढतीत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली, तर स्पर्धेत आतापर्यंत नऊ गोल केलेला दिल्लीचा ब्राझीलियन स्ट्रायकर मार्सेलो परेरा मागील लढतीत मिळालेल्या स्पर्धेतील चौथ्या यलो कार्डमुळे आज खेळू शकला नाही. दिल्लीचे प्रशिक्षक जियानलुसा झॅंब्रोटा यांनी कर्णधार फ्लोरेंट मलुडा याला 71व्या मिनिटापर्यंत राखीव फळीत ठेवले. सामन्याच्या नवव्या मिनिटाला दिएगो फॉर्लानच्या फ्रीकिकवर उदांता सिंगने चेंडू दिल्लीच्या गोलजाळीच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका दिशाहीन ठरला. त्यानंतर चौदाव्या मिनिटाला पुन्हा एकदा मुंबईस यश मिळाले नाही. दिल्लीच्या बचावपटूंनी मातियास डिफेडेरिको याला यशस्वी होऊ दिले नाही. नंतर 22व्या मिनिटाला ओटासिलिओ अल्वेस याचा फटका दिल्लीचा गोलरक्षक सांताना याने अडविला. विश्रांतीनंतरच्या दहाव्या मिनिटाला लुसियान गोईयान याच्या शानदार पासवर डिफेडेरिको चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईचे नुकसान झाले. झॅंब्रोटा यांनी अखेर 71व्या मिनिटाला मलुडा याला संधी देताना बदारा मादजी याला माघारी बोलावले, तसेच आक्रमण अधिक धारदार करण्याच्या उद्देशाने मिलन सिंगलाही मैदानात उतरविले. सामन्याच्या 72व्या मिनिटास मुंबई सिटीची आघाडी अगदी थोडक्यात हुकली. ओटासिलिओ अल्वेस याच्या फटक्याने गोलरक्षकाचा बचाव भेदल्यानंतर क्रॉसबारला धडक दिली. त्यानंतर प्रतिआक्रमण रचताना दिल्लीने आक्रमण रचले, परंतु ब्रुनो पेलिसारी यशस्वी ठरला नाही. सामन्याच्या 77व्या मिनिटाला मुंबई सिटीचे प्रशिक्षक ऍलेक्झांड्रे ग्युमारेस यांनी संघात बदल करताना मातियस डिफेडेरिको याच्या जागी सोनी नोर्दे याला मैदानात धाडले. सोनी याने लगेच आपली उपस्थिती जाणवून दिली. फॉर्लानकडून मिळालेल्या चेंडूवर सोनीचा फटका प्रतिस्पर्धी बचावपटूस आपटून गोलरक्षकाच्या हाती गेला. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीला आघाडी घेण्याची मस्त संधी होती, पण दिल्लीच्या चिंग्लेन्साना सिंग याच्या दक्षतेमुळे मुंबईचे आक्रमण यशस्वी ठरू शकले नाहीत. जेर्सन व्हिएराचा हेडर त्याने निर्णायक क्षणी रोखला व त्यानंतर गोलरक्षका सांताना याने चेंडूवर ताबा राखत पुढील धोका टाळला.]]>