पणजी, दिनांक 30 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी या गतस्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या संघांमध्ये लढत होत आहे. गोवा 13 सामन्यांतून 11 गुणांसह तळात आहे. हा सामना जिंकला तरी त्यांचे स्थान शेवटचेच राहील. गोव्याचे प्रशिक्षक झिको यांच्यासाठी यंदाची स्पर्धा लक्षात ठेवण्याजोगी नसेल, पण तरिही संघाची प्रतिष्ठा पणाला लागली असेल. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात चेन्नईयीनविरुद्ध अंतिम टप्यात दोन गोल झाल्यामुळे गोवा 2-3 असे हरला. त्याआधी त्यांच्याकडे 2-1 अशी आघाडी होती, पण स्टार खेळाडू स्टीव्हन मेंडोझा याच्या दोन गोलमुळे चेन्नईयीनने बाजी मारली. हा पराभव गोव्याच्या खेळाडूंना आणि त्यांच्या चाहत्यांना अजूनही व्यथित करतो. आता पुन्हा चेन्नईयीनशी लढत असल्यामुळे थोडी भरपाई करण्याची त्यांना संधी आहे. यंदा मागील सामन्यात गोव्याला दिल्लीकडून 1-5 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे झिको यांना यावेळी अनुकूल निकालाची अपेक्षा आहे. या पराभवाबद्दल ते म्हणाले की, दिल्लीचा संघ फार चांगला व सुसंघटित आहे. त्यांना स्वतःचे बलस्थान ठाऊक आहे. पहिल्या सत्रात आम्ही त्यांना रोखले, पण उत्तरार्धात त्यांना मार्ग सापडला. दुसरा मुद्दा म्हणजे प्रेरणा मिळते तेव्हा एका पद्धतीने तुम्ही खेळ करता. म्हणजे उपांत्य फेरीची संधी असेल तर खेळ उंचावतो. आमच्यासमोर असे काही नव्हते आणि याचाही परिणाम झाला. चेन्नईयीनच्या आशा सुद्धा संपुष्टात आल्या आहेत, पण गोव्याला हरवून शक्य तेवढा वरचा क्रमांक मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. चेन्नईयीनला अखेरच्या मिनिटाला नॉर्थईस्टविरुद्ध गोल होऊन 3-3 अशा बरोबरीपर्यंत संधी होती. या निकालामुळे त्यांचे आव्हान संपले. त्यामुळे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी निराश झाले. दिल्लीला वर्चस्व राखूनही अंतिम टप्यात गोल पत्करावे लागले आणि हिच त्यांची समस्या ठरली. नॉर्थईस्टशिवाय एटीके, मुंबई व पुण्याविरुद्ध हेच घडले. आव्हान संपले तरी संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मॅटेराझी यांनी पहिल्या तीन वर्षांतील ठळक कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतात या, पहिल्या वर्षी तुमचा संघ उपांत्य फेरी गाठेल, दुसऱ्या वर्षी जिंकेल आणि तिसऱ्या वर्षी असे घडेल असे तीन वर्षांपूर्वी मला कुणी सांगितले असते तरी मी करार केला असता. त्यामुळे नॉर्थईस्टविरुद्धच्या बरोबरीविषयी माझी तक्रार नाही. आता आम्ही गोव्याविरुद्ध शक्य तेवढा चांगला खेळ करू शकतो. हा सामना जिंकल्यास व इतर निकाल अनुकूल लागल्यास चेन्नईयीन पाचवा क्रमांक मिळवू शकेल.]]>