दिल्ली, तारीख 27 नोव्हेंबर 2016: मार्सेलो परेराची हॅटट्रिक आणि रिचर्ड गादझेचे दोन गोल या जबरदस्त कामगिरीमुळे हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दिल्ली डायनॅमोजने तळाच्या एफसी गोवा संघाचा 5-1 असा धुव्वा उडविला. एकतर्फी विजयासह दिल्लीने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच राखली. सामना रविवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पूर्वार्धातील 1-1 अशा गोलबरोबरीनंतर दिल्लीने उत्तरार्धाच्या प्रारंभी धडाकेबाज खेळ करत मोठी आघाडी प्राप्त केली. विश्रांतीनंतर दहा मिनिटांत चार गोल झाले. मार्सेलोने यंदाच्या स्पर्धेत एकूण आठ गोल नोंदविले आहेत, तर गादझेच्या खाती पाच गोल जमा झाले आहेत. दिल्लीचा हा पाचवा विजय ठरला. त्यांचे 12 सामन्यांतून 20 गुण झाले असून आणखी दोन सामने बाकी आहेत. मुंबई सिटीपेक्षा दोन गुण कमी असलेला दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. एफसी गोवावर आठव्या पराभवाची नामुष्की आली. 13 लढतीनंतर त्यांचे 11 गुण आणि तळाचा आठवा क्रमांक कायम राहिला. त्यांच्या तळाच्या क्रमांकात फरक पडणार नाही हे आजच्या पराभवामुळे स्पष्ट झाले. दिल्लीने पिछाडीवरून जबरदस्त मुसंडी मारली. 31व्या मिनिटाला फुलजान्सो कार्दोझच्या गोलमुळे पाहुण्या संघाने आघाडी घेतली, पण नंतर यजमान संघाने उसळी घेत एफसी गोवाच्या बचावाच्या ठिकऱ्या उडविल्या. 38व्या मिनिटाला ब्राझीलियन मार्सेलो परेराने दिल्लीला बरोबरी साधून दिली. विश्रांतीनंतर कमाल झाली. दिल्लीच्या मार्सेलो व घानाचा रिचर्ड गादझे यांनी दहा मिनिटांत एकत्रित चार गोल केले. त्यामुळे दिल्लीपाशी 5-1 अशी मजबूत आघाडी जमा झाली आणि झिको यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाने हात टेकले. मार्सेलोने 48व्या, तर गादझे याने 51व्या मिनिटाला गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीचा बचाव उघडा पाडला. नंतर 56व्या मिनिटाला मार्सेलोने यंदाच्या आयएसएलमधील तिसऱ्या हॅटट्रिकचा मान मिळविला, तर 58व्या मिनिटाला गादझे याने सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदविला. मोठी आघाडी मिळविल्यानंतर दिल्लीने सूत्रे राखत खेळ नियंत्रणाखाली राखला. फुलजान्सो याने एफसी गोवाचे खाते खोलले. ज्युलिओ सीझरने दिल्लीच्या रिंगणात मुसंडी मारली होती. त्याने मारलेल्या फटक्यावर दिल्लीचा गोलरक्षक सोराम पोईरेई याने चेंडू रोखला, परंतु रिबाऊंडवर फुलजान्सोने संधीचा लाभ उठविला. मात्र पाहुण्यांचा हा आनंद आणखी सातच मिनिटे टिकला. फ्लोरेंट मलुडाच्या “असिस्ट’वर मार्सेलोने यजमानांना बरोबरी साधून दिली. एफसी गोवाच्या प्रतेश शिरोडकरने दिल्लीच्या मार्कोस तेबार याला “फाऊल’ केल्यामुळे मिळालेल्या फ्रीकिकवर मलुडा याने मार्सेलोकडे चेंडू पास केला. ब्राझीलियन खेळाडूच्या सणसणीत फटक्याचा गोलरक्षक कट्टीमनीस अजिबात अंदाज आला नाही. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर एकामागोमाग गोल झाले. त्यामुळे एफसी गोवा संघ गांगरून गेला. त्यांच्या बचावफळीचा पूर्णपणे फज्जा उडाला. विश्रांतीनंतर खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला दिल्लीच्या खाती आघाडी जमा झाली. सौविक चक्रवर्तीच्या “थ्रो-ईन’वर मार्सेलोने चेंडू नियंत्रित केला आणि नंतर गोलरिंगणाबाहेरून डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या झंझावाती फटक्यावर गोलरक्षक कट्टीमनीस पूर्णतः हतबल ठरविले. आणखी तीन मिनिटानंतर गादझेने चेंडूला अचूक दिशा दाखविली. मार्सेलोच्या शानदार “असिस्ट’वर त्याने हा गोल केला. विश्रांतीनंतरच्या अकराव्या मिनिटाला मार्कोस तेबारच्या “असिस्ट’वर मार्सेलोने हॅटट्रिकचा मान मिळविला. त्याला मार्कोसने डाव्या बगलेतून सुरेखपणे चेंडू पुरविला. त्याने छातीवर चेंडूवर नियंत्रित केला आणि गोलरिंगणात मुसंडी मारली. नंतर अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करत गोलरक्षकाला लीलया चकविले. पुढच्याच मिनिटास गादझेने दिल्लीच्या खाती पाचव्या गोलची भर टाकली. तेबारने दिलेल्या पासवर गादझेने सुरेखपणे चेंडूवर ताबा राखला, नंतर गोलरक्षक कट्टीमनीस गुंगारा देण्याचे काम त्याने चोखपणे बजावले. नंतर 69व्या मिनिटाला गादझेला प्रशिक्षक जियानलुसा झॅंब्रोटा याने विश्रांती दिली व बदारा बादजी याला मैदानात पाठविले. 82व्या मिनिटाला मार्सेलो यालाही विश्रांती देण्यात आली. त्याची जागा ब्रुनो पेलिसरीने घेतली. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना केन लुईसला दिल्लीच्या खाती सहावा गोल नोंदविण्याची संधी होती. त्याने एफसी गोवाच्या बचावफळीलाही चकविले होते, नंतर गोलरक्षकाचाही अंदाज चुकविला, परंतु लुईसचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने दिशाहीन ठरला.]]>