चेन्नई, दिनांक 25 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमधील आव्हान कायम राखण्यासाठी चेन्नईयीन एफसीला पुढील दोन्ही सामन्यांत निर्णायक विजय अनिवार्य आहे. गतविजेता संघ 12 सामन्यांतून 14 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यांना कमाल सहा गुणांची गरज आहे. अशा लढती चेन्नईयीनला नव्या नाहीत. शनिवारी नेहरू स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध खेळताना त्यांना हेच दाखवून द्यावे लागेल. गेल्या मोसमात चेन्नईयीन बहुतांश वेळा खाली होता, पण अंतिम टप्यात त्यांनी मुसंडी मारली. उपांत्य फेरीला पात्र ठरण्याशिवाय त्यांनी नंतर एफसी गोवाला हरवून विजेतेपदही खेचून आणले. यावेळी मात्र प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांच्या योजनेनुसार प्रत्येक गोष्ट घडलेली नाही. यानंतरही गतविजेत्यांसाठी स्पर्धा संपलेली नाही. मॅटेराझी म्हणाले की, आम्हाला विजय अनिवार्य आहे. पुढील दोन सामने जिंकावे लागतील. प्रत्येक संघाला झुंज देऊ शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. चेन्नईयीनला गेल्या पाच सामन्यांत तीन पराभव पत्करावे लागले. मागील सामन्यांत मुंबई सिटी एफसीकडून ते हरले. आता शनिवारी तसेच त्यानंतर गोव्याविरुद्ध त्यांना ढिलाई करून चालणार नाही. नॉर्थईस्टने मागील सामन्यात एफसी पुणे सिटीवर एकमेव गोलने मात करून मोहीमेत जान आणली. यामुळे त्यांच्या आशा कायम आहेत. त्याआधी त्यांना सहा सामन्यांत एकही विजय मिळाला नव्हता. त्यांनी चार पराभव पत्करले होते. पुण्याला हरविल्यामुळे 11 सामन्यांतून 14 गुणांसह हा संघ सहावा आहे. त्यांचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी सांगितले की, नॉर्थईस्टच्या कट्टर समर्थकांना मी सांगू इच्छितो की आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देऊ. उरलेले तिन्ही सामने जिंकण्यासाठी आम्ही खेळू. नॉर्थईस्टची यानंतर 30 तारखेला दिल्ली डायनॅमोज, तर चार डीसेंबरला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत आहे. पहिल्या पसंतीचे बचावपटू रॉबीन गुरुंग, गुस्तावो लॅझ्झारेट्टी आणि निर्मल छेत्री उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. पुण्याविरुद्ध ते खेळू शकले नव्हते. विंगाडा यांनी मात्र कोणतेही भाष्य केले नाही. ते इतकेच म्हणाले की, गुस्तावो इतरांपेक्षा चांगल्या फॉर्मात आहे, पण आम्ही त्यांना खेळवून धोका पत्करू शकत नाही. याचे कारण ते उर्वरीत स्पर्धेसाठी हवे आहेत. ही लढत जिंकणारा संघ पहिल्या चार क्रमांकांत स्थान मिळवेल.]]>