गुवाहाटी, दिनांक 21 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि पुणे सिटी एफसी यांच्यात येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर लढत होत आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. नॉर्थईस्टला गेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळविता आलेला नाही, पण त्यांचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी संघाच्या क्षमतेवरील विश्वास गमावलेला नाही. दिल्ली डायनॅमोज आणि अॅटलेटीको डी कोलकता यांच्याविरुद्ध साधलेले बरोबरीचे निकालच केवळ नॉर्थईस्टला दिलासा देणारे ठरले. इतर चार लढती त्यांनी गमावल्या. यानंतरही संघ पुण्याच्या प्रेरित झालेल्या संघाविरुद्ध पारडे फिरवू शकतो असा विश्वास विंगाडा यांना वाटतो. नॉर्थईस्टने यंदाच्या स्पर्धेत सुरवातीला आघाडी घेतली होती. त्यांनी घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्स आणि एफसी गोवा या संघांना पाठोपाठ हरविले. नंतर त्यांना घरच्या प्रेक्षकांसमोर पुढील तीन सामने गमवावे लागले. आता त्यांचे घरच्या मैदानावरील आणखी दोन सामने बाकी आहेत. समीकरणाला छेद देत आपला संघ आगेकूच करू शकतो याविषयी विंगाडा यांना कोणतीही शंका वाटत नाही. ते म्हणाले की, नॉर्थईस्टचे आव्हान अजूनही कायम आहे हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही चांगला खेळ करून कोणत्याही संघाला हरवू शकतो. यात कोणतीही शंका नाही. आम्ही घरच्या मैदानावर परतलो आहोत ही फार चांगली गोष्ट घडली आहे. मी खेळाडूंच्या कामगिरीविषयी समाधानी आहे. आम्हाला अजूनही संधी असल्याचे वाटते. नॉर्थईस्टचा संघ सध्या 10 सामन्यांतून 11 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यांच्या तुलनेत तळातील एफसी गोवाचा एक सामना बाकी आहे, पण सर्व संघ एकमेकांच्या इतके जवळ आहेत की एक सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील प्रवेशाला मोठा हातभार लागू शकतो. विंगाडा यांनी सांगितले की, आम्ही असा खेळ केला तर गोल करु शकतो. गेल्या वर्षी चेन्नईयीनचे उदाहरण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते, पण त्यांनी शेवटच्या चार सामन्यांत सरस खेळ करून जेतेपद पटकावले. अगदी गोवा सुद्धा चांगला खेळ करून पात्र ठरू शकतो. नॉर्थईस्टला अखेरच्या क्षणी गोव्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले, तर एटीकेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. आता दिल्लीला धक्का दिलेल्या पुण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. दिल्लीचा संघ सध्याचा सर्वोत्तम फॉर्मातील संघ मानला जात आहे. पुण्याने 4-3 असा आश्चर्यकारक विजय मिळवून चौथ्या स्थानावर झेप घेतली. पुण्याचे 11 सामन्यांतून 15 गुण आहेत. ही लढत जिंकल्यास प्रतिस्पर्ध्याच्या मैदानांवरील खडतर टप्यातून वाटचाल करणे सुकर होईल असे पुण्याचे प्रशिक्षक अँटोनीओ हबास यांना वाटते. पुण्याला नॉर्थईस्टशिवाय केरळा आणि एटीके यांच्या मैदानांवर खेळायचे आहे. हबास म्हणाले की, आम्ही या घडीला केवळ नॉर्थईस्टच्या लढतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्हाला बराच प्रवास करायचा आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूंना पुढील सामन्यासाठी शारिरीकदृष्ट्या लवकर सज्ज होण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. आम्ही उपांत्य फेरीचा विचार आताच करीत नाही. गेल्या तीन सामन्यांत दोन विजय मिळवित फॉर्म गवसला असला तरी हबास काहीही गृहीत धरण्यास तयार नाहीत. ते म्हणाले की, दोन सामन्यांपूर्वी आमच्या आशा जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र तुम्ही पाहिले आहे, पण आता आम्ही पुन्हा चांगला खेळ करायला लागलो आहोत. आमची मोहीम पुन्हा रुळावर आली आहे. आम्हाला पहिल्या चार संघांमधील स्थान कायम ठेवावे लागेल. अपेक्षित निकाल लागण्यासाठी आम्हाला संतुलन साधावे लागेल. दोन डीसेंबर रोजी आमची स्थिती काय असेल ते पाहूयात.]]>