पिछाडीवरून चेन्नईयीनची कोलकताशी बरोबरी

चेन्नई, दिनांक 20 नोव्हेंबर 2016: गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने उत्तरार्धात चमकदार खेळ करत हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ऍटलेटिको द कोलकतास 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. त्यांनी पिछाडीवरून एक गुण प्राप्त केला. सामना रविवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पोर्तुगीज खेळाडू हेल्दर पोस्तिगा याने 39व्या मिनिटाला ऍटलेटिको द कोलकता संघाला आघाडी मिळवून दिली. पाहुणा संघ विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता. नंतर 77व्या मिनिटाला इटालियन आघाडीपटू डेव्हिड सुसी याच्या भेदक हेडरमुळे चेन्नईयीनने बरोबरी साधली. उत्तरार्धाच्या खेळात यजमान संघाने संधीचा लाभ उठविला असता, तर त्यांना घरच्या मैदानावर विजय शक्‍य झाला असता. शेवटच्या काही मिनिटात चेन्नईयीनला सदोष फटकेबाजीही भोवली. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. कोलकताचे 11 सामन्यांतून 15 गुण झाले आहेत. त्यांना गुणतक्‍त्यात पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेता आली. एफसी पुणे सिटी आणि केरळा ब्लास्टर्सचेही 15 गुण झाले आहेत, मात्र चांगल्या गोलसरासरीमुळे माजी विजेते वरच्या क्रमांकावर आहेत. चेन्नईयीनचे 11 सामन्यांतून 14 गुण झाले आहेत. मात्र त्यांच्या सहाव्या क्रमांकात फरक पडलेला नाही. पहिल्या टप्प्यात कोलकता येथेही 2-2 अशी गोलबरोबरी झाली होती. विश्रांतीला सहा मिनिटे बाकी असताना कोलकताने आघाडी घेतली. हेल्दर पोस्तिगा याच्या प्रेक्षणीय हेडरमुळे माजी विजेत्यांनी खाते खोलले. हावियर लारा ग्रान्डे याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर प्रीतम कोटल याने गोलरिंगणात शानदार क्रॉसपास केला. पोस्तिगाने चेंडूला हेडरद्वारे गोलजाळीची दिशा दाखविली. यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजित सिंगचा अंदाज साफ चुकला. या गोलमुळे पूर्वार्धाचा खेळ संपला तेव्हा पाहुणा संघ एका गोलने आघाडीवर होता. पहिल्या 45व्या मिनिटातील खेळात दोन्ही संघांना संधी चुकल्या. तुलनेत कोलकत्याचा संघ जास्त आक्रमक होता, त्यामुळे चेन्नईयीन संघ वारंवार दडपणाखाली आला. पूर्वार्धाच्या प्रारंभीच यजमान संघाला धक्का बसला. त्यांचा हुकमी आघाडीपटू जेजे लालपेखलुआ याला दुखापतीमुळे 22व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले. त्याची जागा डॅनियल लालहलिमपुईया याने घेतली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला हेल्दर पोस्तिगाला गोल करण्याची सुरेख संधी होती, परंतु त्याचा हेडर गोलपोस्टला आपटला. अकराव्या मिनिटाला हॅन्स म्युल्डरचा प्रयत्न कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने फोल ठरविला. चेन्नईयीनने पिछाडीनंतर उत्तरार्धात खेळाची व्यूहरचना बदलली. त्यांनी अधिकाधिक आक्रमणावर दिला. सामन्याची तेरा मिनिटे बाकी असताना यजमानांना अखेर बरोबरी साधण्यात यश मिळाले. डेव्हिड सुसी यांनी त्यांना बरोबरी साधून दिली. एली साबियाच्या शानदार “असिस्ट’वर सुसीच्या हेडर मजुमदारसाठी अडविण्यास अवघड ठरला. अगोदरचे दोन प्रयत्न चुकलेल्या सुसीने यावेळी भरपाई केली. त्यापूर्वी 71व्या मिनिटाला सुसी याचाच प्रयत्न अगदी थोडक्‍यात हुकल्यामुळे चेन्नईयीनची बरोबरीची संधी हुकली होती. त्याचा प्रयत्न गोलरक्षकाने रोखला होता, परंतु रिबाऊंडवर सुसी चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. त्यापूर्वी 56व्या मिनिटास सुसी चेंडूला अचूक दिशेने फटका मारू शकला नव्हता, त्यामुळे कोलकताची आघाडी कायम राहिली होती. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या दक्षतेमुळे चेन्नईयीनला आघाडी घेता आली नाही. राफाएल आगुस्तोचा झंझावाती फटका मजुमदारने वेळीच फोल ठरविला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *