मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्य निवडणूक आयुक्त

जळगाव (सागर कुलकर्णी) दि.१६ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम यावर आयोग कटाक्षाने भर देत आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे सांगितले. नाशिक विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील आढावा बैठक आज येथे घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, अपर पोलीस महासंचालक एस.पी. यादव, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक नवल बजाज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवाडे, नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जळगावच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जळगाव जिल्ह्यासाठी मुख्य निवडणुक निरीक्षक आस्तिककुमार पाण्डेय, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य निवडणुक निरीक्षक रविंद्र बिनवडे, जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला श्री. सहारिया यांनी उपस्थित पत्रकारांना राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १९२ नगरपरिषदा व २० नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील २५ जिल्ह्यांमधील १४७ नगरपरिषदा व १८ नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबर, २०१६ रोजी मतदान होत आहे. त्यांच्या तयारी संदर्भात विभागीय पातळीवर आढावा बैठका घेत आहोत. यात प्रामुख्याने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक संदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जागृती हाती घेण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले असल्याचे सांगून श्री. सहारिया म्हणाले की, मतदार जागृती प्रामुख्याने मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे, तसेच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबत देखील मतदार जागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बॅंकांमधुन सध्या होत असलेल्या चलन वितरणासाठी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावावी, निवडणुकीत मतदानानंतर मतदात्याच्या डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला शाई लावली जाते, असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. सर्व उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासण्याचे अधिकार निवडणुक यंत्रणेला आहेत. उमेदवारांनी आपला खर्च विहित मुदतीत सादर करावा. तसे न करणाऱ्या उमेदवारांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *