चेन्नई, दिनांक 15 नोव्हेंबर 2016: सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवत गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पाच लढतीनंतर पहिला विजय मिळविला. त्यांनी एफसी पुणे सिटीला दोन गोलांनी नमविले. सामना मंगळवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. भारताचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याने 44व्या मिनिटाला यजमान संघाला आघाडीवर नेले, तर 51व्या मिनिटाला डेव्हिड सुसी याने गतविजेत्यांसाठी दुसरा गोल नोंदविला. मागील पाच लढतीत तीन बरोबरी आणि दोन सलग पराभव यामुळे चेन्नईयीन एफसीची स्पर्धेत घसरण झाली होती. आज विजय मिळविल्यामुळे त्यांना प्रगती साधला आली. त्यांनी 13 गुणांसह सातव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. यजमान संघाचा हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. “अवे’ मैदानावर लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या पुणे सिटीला आज अपयश प्राप्त झाले. त्यांचा हा स्पर्धेतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे गुणतक्त्यातील स्थानही घसरले. 12 गुणांसह हा संघ सहाव्या स्थानी आला आहे. पूर्वार्धातील खेळात दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांची ताकद आजमावण्यावरच जास्त भर दिला, मात्र विश्रांतीला एक मिनिट बाकी असताना जेजे लालपेखलुआ याच्या गोलमुळे यजमान संघाला एका गोलची आघाडी मिळाली. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांना पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. कामगिरीत घसरण झालेल्या चेन्नईयीनने आज सुरवातीस धोका पत्करला नाही. पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना चेन्नईयीनच्या हॅन्स म्युल्डर याने पुणे सिटीच्या जेरी लालरिनझुआला याला गुंगारा दिला आणि गोलरिंगणात डेव्हिड सुसी याला क्रॉसपासद्वारे चेंडू पुरविला. सुसीने वेळ न दवडता जेजेला चेंडू पुरविला. यावेळी भारताचा हा स्ट्रायकर गोलरिंगणात मोकळाच होता. प्रतिस्पर्धी बचावपटू जवळपास नसल्याची संधी साधत जेजे याने हेडरवर गोलरक्षक अपौला इदेल बेटे याला चकवून यंदाच्या स्पर्धेतील आपला तिसरा गोल नोंदविला. उत्तरार्धाच्या सुरवातीस पुणे सिटीचे प्रशिक्षक अंतोनिओ हबास यांनी लेनी रॉड्रिग्जच्या जागी युजिनसन लिंगडोह याला मैदानावर पाठविले. त्यानंतर 49व्या मिनिटाला पुणे सिटीला बरोबरीची संधी होती, परंतु जोनाथन लुकाचा प्रयत्न चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजित सिंगने यशस्वी होऊ दिला नाही. उत्तरार्धातील सहाव्या मिनिटाला सुसी याने यजमानांची आघाडी फुगविली. चेन्नईयीनला फ्रीकिक फटका मिळाला असता, बर्नार्ड मेंडी याने राफाएल आगुस्तो याला पास दिला. राफाएलच्या क्रॉसपासवर पुणे सिटीचा बचावपटू चेंडू रोखू शकला नाही, त्याचा लाभ उठवत सुसी याने भेदक हेडरद्वारे चेन्नईयीनच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली. चेन्नईयीनने दोन गोलांची मजबूत आघाडी मिळविल्यानंतरही पुणे सिटीच्या रिंगणात आक्रमण कायम राखले. त्यांच्या जेजे लालपेखलुआ आणि हॅन्स म्युल्डर याचे फटके वाया गेल्यामुळे आघाडी फुगू शकली नाही. 78व्या मिनिटाला पाहुण्या संघाचा गोलरक्षक बेटे याच्या दक्षतेमुळे चेन्नईयीनला पुन्हा गोल करण्यापासून दूर राहावे लागले. डेव्हिड सुसी याने बचावफळीस गुंगारा देत मारलेल्या फटक्यावर बेटे याने चेंडू दिशाहीन केला.]]>