गोवा, दिनांक 15 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवायच्या असतील तर एफसी गोवा संघाला मुंबई सिटी एफसीविरुद्ध प्रेरणादायी कामगिरीची गरज असेल. बुधवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल. गोव्याचा संघ दहा सामन्यांतून दहा गुणांसह तळात आहे. आता चार सामने बाकी आहेत. पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांना कमाल गुणांची गरज आहे. मागील सामन्यात गोव्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 2-1 असे हरविले. रोमीओ फर्नांडीसने अखेरच्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. मुंबईविरुद्ध त्यांना पुन्हा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. मागील सामन्यातील प्रभावी कामगिरीशिवाय यंदा पहिला विजय मिळविताना गोव्याने मुंबईला मुंबईत हरविले होते. साहजिकच यामुळे सुद्धा गोव्याचे मनोधैर्य उंचावलेले असेल. घरच्या मैदानावर गोव्याला चार सामन्यांत केवळ तीन गुण मिळाले आहेत. त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले. आता रॉबीन सिंग आणि रोमीओ फर्नांडीस अशा भारतीय खेळाडूंनी अखेर गोल केले. त्यामुळे गोव्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोघांनी वैयक्तिक पहिला गोल करण्याबरोबरच दुसऱ्यासाठी गोलची चालही रचली. योगायोगाने रोमीओने रॉबीनला अॅसीस्ट केले. याबरोबरच स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक सात अॅसिस्ट रोमीओच्या नावावर जमा आहेत. मुंबईला एफसी पुणे सिटीविरुद्ध 0-1 असे पराभूत व्हावे लागले. अखेरच्या मिनिटाला युजीन्सन लिंगडोहने गोल केला. बचाव फळीच्या चुकीचा त्याने फायदा उठविला. या पराभवामुळे मुंबईची उपांत्य फेरीच्या दिशेने होणारी वाटचाल विस्कळीत झाली, पण प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील उत्साहवर्धक कामगिरी मुंबईच्या जमेची बाब आहे. मुंबईने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सर्वाधिक 11 गुण मिळविले आहेत. यंदा त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर तीन सामने जिंकले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या दोनने जास्त आहे. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, आम्ही अजूनही चांगल्या स्थितीत आहोत, पण पराभवामुळे पुढील वाटचाल सोपी नसेल असा इशारा आम्हाला मिळाला. आम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि गुणांसाठी संघर्ष करावा लागेल याचीही जाणीव झाली. खेळाडूंना परिस्थितीची जाणीव असून ते पुढील सामन्यात कसून प्रयत्न करतील याची खात्री वाटते. मुंबई सिटी 10 सामन्यांतून 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली डायनॅमोजचे 17, तर केरळा ब्लास्टर्सचे 15 गुण आहेत. त्यानंतर मुंबईचा क्रमांक असला तरी अॅटलेटीको डी कोलकता (13), एफसी पुणे सिटी (12) त्यांना गाठू शकतात. याचे कारण या दोन संघांचा एक सामना बाकी आहे. एफसी गोवा 10 सामन्यांतून दहा गुणांसह तळात आहे.]]>