कोची, दिनांक 12 नोव्हेंबर 2016: सी. के. विनीत पुन्हा एकदा केरळा ब्लास्टर्ससाठी “मॅचविनर’ ठरला. त्याने नोंदविलेल्या दोन जबरदस्त गोलांमुळे शनिवारी यजमानांनी पिछाडीवरून गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला 3-1 अशा फरकाने हरविले. सामना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. विजयामुळे केरळा ब्लास्टर्स दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना विनीतने केरळास आघाडी मिळवून दिली. त्याने एफसी गोवाविरुद्धच्या मागील लढतीतही “स्टॉपेज टाईम’मध्ये संघाला पूर्ण तीन गुण मिळवून देणारा गोल केला होता. आज त्याने चार मिनिटांत दोन गोल करून केरळाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विनीतने अनुक्रमे 85 व 89व्या मिनिटास चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली. त्यापूर्वी 22व्या मिनिटास बर्नार्ड मेंडी याने चेन्नईयीनला आघाडीवर नेल्यानंतर 66व्या मिनिटास बदली खेळाडू दिदियर कादियो याने केरळास बरोबरी साधून दिली होती. आयएसएल स्पर्धेत उभय संघांत झालेल्या सहा लढतीतील केरळाचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी या दोन्ही संघांतील लढतीत चेन्नईयीनने तीन विजय मिळविले होते, तर दोन लढती बरोबरीत राहिल्या होत्या. विजयाच्या तीन गुणांमुळे केरळा ब्लास्टर्सने गुणतक्त्यातही प्रगती साधली आहे. त्यांचे 15 गुण झाले आहेत. त्यांचा हा दहा सामन्यांतील चौथा विजय ठरला. चेन्नईयीन एफसीची खराब कामगिरी कायम राहिली. त्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे ते ओळीने पाचव्या सामन्यात विजयापासून दूर राहिले. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे गतविजेत्यांचे नऊ सामन्यांनंतर 10 गुण आणि सातवा क्रमांक कायम राहिला आहे. चेन्नईयीन एफसीचा अनुभवी खेळाडू बर्नार्ड मेंडी याने 22व्या मिनिटास संघाला आघाडी मिळवून दिली. चेन्नईयीनचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांनी आज मेंडी याला डाव्या “विंग’मध्ये खेळविले, त्यांचा हा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. राफाएल आगुस्तो याच्या पासवर मेंडी याने डाव्या बगलेतून जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर त्याने मारलेला फटका केरळाचा कर्णधार सेड्रिक हेंगबार्ट याला चाटून गोलजाळीत गेला, यावेळी गोलरक्षक ग्रॅहॅम स्टॅक याचा अंदाज पूर्णपणे चुकला. डुडू ओमागबेमी याने पूर्वार्धातील खेळात मिळालेली संधी सार्थकी लावली असती तर चेन्नईयीनला आघाडी फुगविणे शक्य झाले असते. डुडू याने अनुक्रमे तिसाव्या आणि 45व्या मिनिटास गोल करण्याची संधी दवडली. त्यामुळे विश्रांतीसाठी खेळ थांबला तेव्हा चेन्नईयीनपाशी एकाच गोलची आघाडी राहिली. केरळाच्या आक्रमणावर केर्व्हर्न बेलफोर्ट याच्या दुखापतीमुळेही मर्यादा आल्या. प्रशिक्षक स्टीव कोपेल याने 28व्या मिनिटाला पहिला बदल करणे भाग पडले. बेलफोर्टला माघारी बोलावून त्यांनी अंतोनिओ जर्मन याला मैदानात पाठविले. उत्तरार्धाच्या सुरवातीस कोपेल याने संघात आणखी एक बदल केला. विशेष परिणामकारक न ठरलेल्या मायकेल चोप्रा याच्याऐवजी त्यांनी दिदियर कादिया याला मैदानात पाठविले. या “सुपर सब’ने आपली निवड सार्थ ठरविली. त्यामुळे 66व्या मिनिटाला यजमान संघाला बरोबरी साधता आली. संघातील आणखी एक बदली खेळाडू अंतोनिओ जर्मन याने डाव्या बगलेत सुरेख खेळ केला. जर्मन याने चेंडूसह मुसंडी मारली, त्या रोखण्यासाठी चेन्नईयीनचा एली साबिया टपला होता, मात्र त्याने साबियाच्या पायामधून चेंडू पास केला. यावेळी गोलपोस्टसमोर कोणतीच चूक न करता चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविण्याचे काम कादिया याने चोखपणे बचावले. त्यापूर्वी केरळाची साठाव्या मिनिटास संधी चुकली होती. मेहताब हुसेनने दिलेल्या चेंडूवर सी. के. विनीत याने डाव्या बगलेतून आक्रमण रचले, मात्र गोलरक्षक ड्वेन केर याने वेळीच चेंडू अडविला. बरोबरीच्या गोलनंतर केरळाने आक्रमण आणखीनच गतिमान केले. चेन्नईयीनचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांनी 76व्या मिनिटाला दमलेल्या जेजे लाखपेखलुआ याला विश्रांती देत हॅन्स म्युल्डरला आक्रमण तेज करण्यासाठी पाठविले. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना केरळाने आघाडी घेतली. जोसू कुरैस याला डाव्या बगलेत चेंडू नियंत्रित केला. त्याने नंतर अप्रतिम क्रॉस पास दिला. यावेळी चेंडू अडविताना गोलरक्षक ड्वेन केर याची गडबड उडाली, त्याचा लाभ उठवत उत्कृष्ट “फिनिश’सह विनीतने संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर लगेच चार मिनिटांनी विनीतने पुन्हा गोलरक्षक केर याला चकविले. यावेळी अंतिनोओ जर्मन याने चेन्नईयीन एफसीचा बचाव भेदला आणि विनीतला उजव्या बगलेत अप्रतिम पास दिला. जागा सोडलेला गोलरक्षक केर याला हतबल ठरवत विनीतने पहिल्याच प्रयत्नात कोन साधून चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली.]]>