दिल्ली, दिनांक 12 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी दिल्ली डायनॅमोजची अॅटलेटीको डी कोलकता संघाशी लढत होत आहे. नेहरू स्टेडियवर होणाऱ्या या लढतीसाठी आपला संघ खास प्रेरीत होईल असे दिल्लीचे प्रशिक्षक जियानल्यूका झँब्रोट्टा यांना वाटते. दिल्ली 16 गुणांसह आघाडीवर आहे. एटीकेला हरविल्यास त्यांची आघाडी चार गुणांपर्यंत वाढेल. एटीके हा यंदा त्यांना हरविलेला एकमेव प्रतिस्पर्धी आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येस आयोजित पत्रकार परिषदेत झँब्रोट्टा म्हणाले की, माझ्या मनात सूडाची भावना नाही, कारण तो सामना चांगला झाला आणि आम्ही चांगल्या संघाकडून हरलो. खास प्रेरणा अशासाठी आहे की आम्हाला हरविलेला हा संघ आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यंदा घरच्या मैदानावर अपराजित राहिलेला दिल्ली हा एकमेव संघ आहे. यापूर्वी घरच्या मैदानावरील लढतीत त्यांनी चेन्नईयीनचा 4-1 असा धुव्वा उडविला. यंदा त्यांनी केलेले 16 पैकी 11 गोल घरच्या मैदानावर झाले आहेत. सहभागी संघांमध्ये त्यांनी घरच्या मैदानावर सर्वाधिक नऊ गुण मिळविले आहेत. मार्सेलिनो, रिचर्ड गाद्झे, फ्लोरेंट मालौदा आणि किन लुईस अशा खेळाडूंच्या क्षमतेमुळे त्यांच्या यशाचा पाया रचला गेला आहे. यंदा वैयक्तिक तीन पेक्षा जास्त गोल केलेले तीन खेळाडू असलेले हा एकमेव संघ आहे. मार्सेलिनोने पाच, तर गाद््झे आणि लुईस यांनी प्रत्येकी तीन गोल केले आहेत. झँब्रोट्टा मात्र वैयक्तिक कामगिरीला अवास्तव महत्त्व देण्यास तयार नाहीत. आपला संघ आणखी सरस खेळ करू शकतो असे त्यांना वाटते. इटलीचे विश्वकरंडक विजेते असलेले झँब्रोट्टा म्हणाले की, मला केवळ दोन खेळाडूंचा नव्हे तर पूर्ण संघाच्या खेळाचा आनंद वाटतो. संपूर्ण संघ कसून सराव करतो आहे. मला अर्थातच आनंद वाटतो, पण आम्ही आणखी सरस खेळायला हवे. आम्ही दिवसागणिक भक्कम खेळ करीत राहिलो तर आघाडी आणखी वाढविता येईल. एटीके संघाला आधीच्या सामन्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम टप्यात त्यांना गोल पत्करावा लागला. प्रशिक्षक होजे मॉलीना या निकालामुळे निराश झाले, पण त्यानंतर त्यांना संघाकडून तयारी करून घेण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. मॉलीना म्हणाले की, पुण्याविरुद्ध हरणे आमच्यासाठी चांगले ठरले नाही, पण शेवटी हा फुटबॉलचा खेळ आहे. प्रत्येक सामना वेगळा असल्याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही या आठवड्यात सराव केला. आम्हाला तयारीसाठी वेळ मिळाला. हा सामना खडतर असेल याची आम्हाला जाणीव आहे. दिल्लीचा संघ आघाडीवर आहे. स्पर्धेत या घडीला कदाचित ते सर्वोत्तम असतील, पण आम्हाला सुद्धा आघाडी घ्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही लढाऊ खेळ करू. मॉलीना यांना आघाडी फळीकडून धडाक्याची अपेक्षा आहे. खास करून त्यांना इयन ह्यूमकडून अपेक्षा आहेत. आयएसएलमध्ये त्याने सर्वाधिक 19 गोल केले आहेत. यंदा मात्र त्याला केवळ तीन गोल करता आले असून ते सर्व पेनल्टीवर झाले आहेत. 2015 मध्ये 11 गोल केलेल्या ह्युमला तसा फॉर्म दाखविता आलेला नाही.]]>