गोवा, दिनांक 10 नोव्हेंबर 2016: एफसी गोवा संघाने पहिल्या हिरो इंडियन सुपर लिगमध्ये अनेक अडथळ्यांवर मात करीत उपांत्य फेरी गाठली होती. या मोसमात आता ते यापासूनच प्रेरणा घेत आहेत. गुणतक्त्यात तळाला घसरलेल्या गोव्याची फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाशी लढत होत आहे. गोवा नऊ सामन्यांतून सात गुणांसह तळाला आहे, पण त्यांनी दहाव्या फेरीच्या या लढतीपूर्वी आशा सोडून दिलेल्या नाहीत. गोव्याचे सहायक प्रशिक्षक वॅनुच्ची फर्नांडो यांनी सांगितले की, फुटबॉलचा खेळच तुम्हा प्रेरणा देतो. फुटबॉलमध्ये आपण प्रत्येक गोष्ट पाहतो. पहिल्या मोसमात आम्ही तळाला होतो, पण आम्ही सलग सहा सामने जिंकले आणि एक फेरी बाकी असतानाच आगेकूच नक्की केली. आता असेच आम्ही पुन्हा करून दाखवूच असे मला म्हणायचे नाही, पण तसे घडावे म्हणून आम्ही हरप्रकारे प्रयत्न करू. हे अजूनही पूर्णपणे आमच्या हातात आहे. गोव्याला आधीच्या फेरीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 1-2 असा पराभव पत्करावा लागला. आघाडी घेतल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. कर्णधार ग्रेगरी अर्नोलीन आणि रिचार्लीसन फेलीस्बीनो या दोन खेळाडूंना मैदानाबाहेर काढण्यात आले. हे दोघे खेळू शकणार नाहीत, तसेच इतर खेळाडूंच्या दुखापतीची समस्या आहे. फर्नांडो यानंतरही शांत आहेत. जो कुणी मैदानावर उतरेल तो संघासाठी सर्वोत्तम खेळ करेल. आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू आणि आवश्यक असलेले तीन गुण मिळवू, असे त्यांनी सांगितले. नॉर्थईस्टला सुद्धा उपांत्य फेरीच्यादृष्टिने तीन गुणांची गरज आहे. मागील सामन्यांत त्यांची मुंबई सिटी एफसीकडून हार झाली. हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला. आता गोव्याकडून तीन गुण वसूल करायचे असल्याचे त्यांचे प्रशिक्षक नेलो विंगाडा म्हणाले. पोर्तुगालचे विंगाडा म्हणाले की, सध्याची स्थिती पाहता आम्हाला हा सामना महत्त्वाचा आहे. आम्ही लीगचा प्रारंभ चांगला केला, पण शेवटी हा फुटबॉलचा खेळ आहे. आम्ही काही सामने गमावले तरी खेळ चांगला होत होता. मागील सामन्यात मात्र अपेक्षित दर्जाचा खेळ झाला नाही. आम्ही संघाची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जिंकणे महत्त्वाचे असेल. गोव्याचे काही खेळाडू नसतील. प्रशिक्षक म्हणून मला आमचे सर्वोत्तम खेळाडू हवे आहेत. त्याचवेळी गोव्याचे सुद्धा सर्वोत्तम खेळाडू खेळावेत असे मला वाटते. आम्हाला सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्याशी खेळायचे आहे. आमचे काही खेळाडू निलंबन व दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. नॉर्थईस्ट आठ सामन्यांतून दहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या दोन सामन्यांमधून त्यांनी सहा गुणांची कमाई केली होती. त्यानंतर मात्र त्यांचा खेळ अपेक्षेनुसार झाला नाही.]]>