पुणे, दिनांक 6 नोव्हेंबर 2016: एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अखेर घरच्या मैदानावर विजय साकारला. त्यांनी रविवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्टेडियमवर चुरशीच्या लढतीत ऍटलेटिको द कोलकता संघाला 2-1 अशा फरकाने हरविले. पुणे सिटीला पुण्यात तब्बल सात सामन्यानंतर आज पहिला विजय नोंदविता आला. यंदाच्या मोसमात घरच्या मैदानावर त्यांना मुंबई सिटी, नॉर्थईस्ट युनायटेड व एफसी गोवाकडून पराभव पत्करावा लागला होता. पुणे सिटीला एदुआर्दो फरेरा याने आघाडीवर नेले. ब्राझीलियन, पण इक्वेटोरियल गिनीतर्फे खेळलेल्या या खेळाडूने 41व्या मिनिटाला हेडरद्वारे यजमान संघाचे खाते खोलले. विश्रांतीला पुणे सिटी संघ एका गोलने आघाडीवर होता. नंतर 56व्या मिनिटाला मेक्सिकन अनिबाल झुर्डो रॉड्रिगेझ याने पेनल्टी फटक्यावर पुणे सिटीसाठी दुसरा गोल नोंदविला. ऍटलेटिको द कोलकताने 69व्या मिनिटाला पिछाडी कमी केली. इयान ह्यूमने पेनल्टी फटका रिबाऊंड झाल्यानंतर लक्ष्य साधले. पुणे सिटीने यंदाच्या मोसमात पाच सामन्यानंतर पहिला विजय नोंदविला. गोव्यात एफसी गोवाला हरविल्यानंतर झालेल्या लढतीत पुणे सिटीला तीन बरोबरी आणि दोन पराभव पत्करावे लागले होते. आज अंतोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने पूर्ण तीन गुणांची कमाई केली. हबास मागील दोन मोसम ऍटलेटिको द कोलकताचे प्रशिक्षक होते. स्पर्धेतील दुसऱ्या विजयामुळे पुणे सिटीचे आठ सामन्यातून नऊ गुण झाले आहेत. त्यांना आता एफसी गोवाला शेवटच्या स्थानावर टाकले आहे. पुणे सिटीला सहावा क्रमांक मिळाला आहे. पराभवामुळे ऍटलेटिको द कोलकताची गुणतक्त्यात प्रगती साधण्याची संधी हुकली. त्यांचा हा स्पर्धेतील दुसराच पराभव ठरला. त्यांचे आठ सामन्यानंतर 12 गुण आणि तिसरा क्रमांक कायम राहिला आहे. आजच्या लढतीत दोन्ही संघातील मिळून एकूण नऊ खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आले. पुणे सिटीने पूर्वार्धात एका गोलची आघाडी घेतली होती. पहिल्या 45 मिनिटांतील खेळ चांगलाच रंगतदार ठरला. दोन्ही संघांनी प्रेक्षणीय चाली रचल्या, मात्र गोल करण्यात यजमान संघाने यश मिळविले. एफसी गोवाविरुद्ध मागील लढतीत पराभूत झालेल्या पुणे सिटीने आज चमकदार खेळ केला. विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना पुणे सिटीचे खाते खोलले. ब्राझीलियन एदुआर्दो फरेरा याने यजमान संघाला आघाडीवर नेले. गोलपोस्टच्या डाव्या बाजूने घेतलेल्या जोनाथन लुका याने घेतलेल्या कॉर्नर किकवर एदुआर्दो फरेराचा हेडर गोलरक्षक मजुमदारसाठी रोखणे अशक्य ठरले. त्यानंतर लगेच डोक्याला मार लागलेल्या एदुआर्दोला “स्ट्रेचर’वरून बाहेर न्यावे लागले. त्याची जागा जेझुस रॉड्रिगेझ टाटो याने घेतली. विश्रांतीनंतर नऊ मिनिटांनी पुणे सिटीला पेनल्टी फटका मिळाला. ऍटलेटिको द कोलकताच्या प्रीतम कोटल याने गोलरिंगणात चेंडू हाताळला, यावेळी कोटलला रेफरींनी यलो कार्ड दाखविले व पुणे सिटीला स्पॉट किक मिळाली. अनिबाल झुर्डो रॉड्रिगेझ याने सणसणीत फटक्यावर पुणे सिटीला दोन गोलांची भक्कम आघाडी मिळवून दिली. यावेळी फटक्यासमोर गोलरक्षक देबजित आडवा आला, परंतु चेंडू त्याच्या डाव्या हाताला लागून गोलजाळीत गेला. ऍटलेटिको द कोलकता संघाला नंतर मिनिटाला पेनल्टी फटका मिळाला. यावेळी पुणे सिटीचा कर्णधार महंमद सिसोका याने गोलरिंगणात कोलकत्याच्या हेल्दर पोस्तिगा याला अडथळा आणला. रेफरींनी कोलकत्याला पेनल्टी फटका बहाल केला. कोलकत्याचा अनुभवी खेळाडू कॅनेडियन इयान ह्यूम याने हा फटका मारला, परंतु गोलरक्षक अपौला इदेल बेटे याने अंदाज बांधत चेंडू अडविला, मात्र ह्यूम याने रिबाऊंडवर संधी गमावली नाही. कोलकत्यास 72व्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी होती, मात्र इयान ह्यूमच्या क्रॉस पासवर सामीग दौती याचा हेडर लक्ष्य साधू शकला नाही. सामन्याच्या 77व्या मिनिटाला इयान ह्यूमची जागा ज्युआन बेनेन्कोसो याने घेतली.]]>