पुणे-एटीके लढतीत सर्वांचे लक्ष प्रशिक्षक हबास यांच्यावर

पुणे, दिनांक 5 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एफसी पुणे सिटीची माजी विजेत्या अॅटलेटीको डी कोलकता (एटीके) संघाशी लढत होत आहे. त्यावेळी सर्वांचे लक्ष प्रशिक्षक अँटोनीओ हबास यांच्यावर असेल. हबास पहिले दोन मोसम एटीकेकडे होते. पहिल्यावहिल्या स्पर्धेत त्यांनी एटीकेला विजेतेपद मिळवून दिले, तर गेल्या मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेने उपांत्य फेरी गाठली. अटीतटीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीकडून एटीकेचा पराभव झाला. नंतर चेन्नईयीनने विजेतेपद मिळविले. यंदाच्या मोसमात हबास यांनी एफसी पुणे सिटीशी करारबद्ध होण्याचे ठरविले, पण आतापर्यंत त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या नाहीत. लीगच्या सुरवातीलाच त्यांना चार सामन्यांच्या निलंबनाला सामोरे जावे लागले. यात त्यांचा संघ केवळ चार गुण मिळवू शकला. मग ते परतल्यानंतर गेल्या तीन सामन्यांत पुणे सिटीला केवळ दोनच गुण मिळाले आहेत. एफसी गोवा संघाकडून हरल्यानंतर त्यांचा संघ गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर गेला. या लढतीनंतर हबास म्हणाले की, आमचा संघ कसून सराव करीत आहे. खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले तरी अखेरच्या मिनिटापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. ही चांगली गोष्ट आहे, पण शेवटी आमच्यासाठी नेहमीचीच समस्या होती आणि ती म्हणजे एकही निर्णय आमच्या बाजूने लागल्याचे मला आठवत नाही. पुणे सिटीचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे एटीकेला हरविल्यास ते गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांना मागे टाकून सहाव्या क्रमांकावर झेप घेऊ शकतात. मात्र पुण्याची घरच्या मैदानावरील खराब कामगिरी आणि एटीकेची यंदाच्या मोसमातील भक्कम कामगिरी पाहता पाहुण्या संघाचे पारडे जड असेल. एटीकेने सात सामन्यांतून 12 गुण मिळविले आहेत. जिंकल्यास ते गुणतक्त्यात आघाडी घेऊ शकतात. हबास यांच्या जागी एटीके प्रशिक्षकपदी नियुक्त झालेले होजे मॉलीना यांनी संघाला उत्तम कामगिरीसाठी प्रेरीत केले आहे. मार्की खेळाडू हेल्डर पोस्टीगा परतल्यामुळे एटीकेचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुखापतीमुळे तो चार सामने खेळू शकला नाही. मग नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध चमकदार पुनरागमन करताना त्याने हेडरवर अप्रतिम गोल केला. हा यंदा त्याचा पहिला गोल ठरला. विशेष म्हणजे गेल्या मोसमात हबास यांनीच पोस्टीगाची मार्की खेळाडू म्हणून निवड केली होती. तो केवळ सलामीच्या सामन्यात खेळू शकला. त्यातच त्याने दोन गोल केले. नंतर त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. हाच पोस्टीगा आता हबास यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न आहे. पोस्टीगा म्हणाला की, चांगली विश्रांती घ्यायची आणि मग सरावाच्यावेळी चांगले प्रयत्न करणे सर्वांत महत्त्वाचे असते. मग सामन्यात चांगला खेळ होतो. आयएसएल ही फार चुरशीची स्पर्धा आहे. पुणे सिटीचा संघ चांगला आहे. हबास कसा विचार करतात याची मला कल्पना आहे, पण हा सामना आमच्यासाठी खडतर आहे. यंदाच्या मोसमात एटीकेने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू राखले आहेत. त्या सर्वांना हबास फार चांगले ओळखतात. त्यामुळे ते एटीकेला रोखण्यासाठी पुणे सिटीच्या संघाची रचना कशी करतात आणि संघाच्या आव्हानात पुन्हा कशी जान निर्माण करतात याची उत्सुकता आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *