गुवाहाटी, दिनांक 4 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) खराब कामगिरीत सुधारणा करण्याची नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाला गरज आहे. अन्यथा त्यांना उपांत्य फेरीतील प्रवेशापासून दूर राहावे लागेल. शनिवारी येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर त्यांची मुंबई सिटी एफसी संघाशी लढत होत आहे. नॉर्थईस्टने पहिल्या चार पैकी तीन सामन्यांत विजय मिळवून आयएसएलमध्ये धडाका सुरु केला. त्यानंतर मात्र तीन सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आला नाही. एक बरोबरी आणि दोन पराभव अशी त्यांची कामगिरी झाली. आता पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना मुंबईविरुद्ध कामगिरीत प्रचंड सुधारणा करावी लागेल. नॉर्थईस्टचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी सांगितले की, आम्ही गेले दोन सामने गमावले असले तरी खेळ तेवढा खराब झालेला नाही. आम्ही बऱ्याच संधी निर्माण केल्या आहेत. आम्हाला लवकरच फॉर्म गवसेल आणि आम्ही चांगल्या स्थितीत असू. पोर्तुगालच्या विंगाडा यांच्यासाठी केवळ पराभवाशिवाय काळजीची इतरही कारणे आहेत. पहिले तीन सामने जिंकताना नॉर्थईस्टने एकही गोल पत्करला नव्हता. पहिल्या चार सामन्यांत त्यांच्यावर एकच गोल झाला होता. गेल्या तीन सामन्यांत मात्र त्यांनी चार गोल पत्करले आहेत. एकाही सामन्यांत त्यांना प्रतिस्पर्ध्याच्या गोलचे खाते रिक्त ठेवता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणला जाणारा सुब्रत पॉल मागील सामन्यात जायबंदी झाला. त्याची गैरहजेरी नॉर्थईस्टसाठी प्रतिकूल ठरू शकते. सुब्रतने आतापर्यंत 24 वेळा बचाव केला आहे. केवळ एडल बेटे हाच दोन वेळा जास्त बचाव करू शखला. सुब्रतने तीन सामन्यांत चोख कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्याच्या गोलचे खाते रिक्त ठेवले आहे. मुंबईचा संघ दौऱ्यावर असताना भक्कम खेळ करीत आहे. यंदा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर त्यांनी आठ गुण कमावले आहेत. मागील सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध मोलाचा गुण गमावला. लिओ कोस्टा याने अंतिम टप्यात गोल केला. गेल्या दोन मोसमांच्या तुलनेत या आघाडीवर त्यांची कामगिरी बरीच सुधारली आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर त्यांना पहिल्या वर्षी केवळ तीन, तर दुसऱ्या वर्षी पाचच गुण मिळविता आले होते. यावेळी ते उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांचा आत्मविश्वास साहजिकच उंचावला असून संघ प्रभावी कामगिरी कायम ठेवेल असा विश्वास त्यांना वाटतो. ते म्हणाले की, चेन्नईयीनविरुद्ध बरोबरी हा निकाल योग्य वाटतो. आमच्यासाठी एक गुण चांगला आहे, पण चेन्नईयीनसाठी असे कदाचित नसेल. कोलकत्यामध्ये आम्ही अप्रतिम खेळ करून जिंकलो आणि मग चेन्नईत अंतिम टप्यात बरोबरी साधल्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. मुंबई आठ सामन्यांतून 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नॉर्थईस्टविरुद्ध जिंकल्यास ते आघाडी घेऊ शकतील.]]>