नवी दिल्ली, दिनांक 3 नोव्हेंबर 2016: दिल्ली डायनॅमोजला हिरो इंडियन सुपर लिगमध्ये यंदा घरच्या मैदानावर अद्याप विजय मिळविता आलेला नाही, पण आघाडी फळीची क्षमता पाहता प्रशिक्षक जियानल्यूका झँब्रोट्टा यांना आपला संघ केरळा ब्लास्टर्सच्या बचाव फळीला भेदून खाते उघडण्याचा विश्वास वाटतो. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीची उत्सुकता त्यामुळे वाढली आहे. दिल्लीने आतापर्यंत घरच्या मैदानावरील तिन्ही सामने बरोबरीत सोडविले आहेत. आता स्पर्धेतील सहभागी संघांमध्ये सर्वोत्तम बचाव असलेल्या केरळाशी त्यांची लढत आहे. अर्थात दिल्लीचा संघ सक्षम आहे. खास करून त्यांच्या आघाडी फळीने दहा गोल केले आहेत, जे सहभागी संघांमध्ये सर्वाधिक आहेत. झँब्रोट्टा यांनी सांगितले की, केरळचा संघ खडतर प्रतिस्पर्धी असल्याची आम्हाला नक्कीच कल्पना आहे. त्यांचा संघ चांगला आहे. ते जिंकतात, ते लढाऊ खेळ करतात. आमच्यासाठी हा सामना खडतर आहे, पण आम्ही सज्ज आहोत. दिल्लीच्या संघाने गोलच्या दिशेने 44 शॉट मारले आहेत. मागील सामन्यात एफसी गोवा संघाला हरविल्यामुळे दिल्लीचे मनोधैर्य उंचावले आहेत. मार्सेलीनो आणि रिचर्ड गाद्झे यांनी उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे दिल्लीला 2-0 असा विजय सहज मिळाला. झँब्रोट्टा यांनी मात्र आपल्या संघाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिला आहे. इटलीचे विश्वकरंडक विजेते असलेले झँब्रोट्टा म्हणाले की, तो सामना खडतर होता. गोव्याविरुद्ध काय घडले त्याचा प्रमाणाबाहेर आनंद मानणे योग्य ठरणार नाही. आम्ही जिंकलो, पण आता आम्हाला पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. हा सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. केरळाचा संघ सध्या पाच सामने अपराजित आहे. आता त्यांनी दिल्लीविरुद्ध ही मालिका राखल्यास आयएसएलमधील ही सर्वाधिक मोठी अपराजित मालिका ठरेल. केरळाने सात सामन्यांतून नऊ गुण मिळविले आहेत. ही त्यांची आयएसएलमधील सर्वोत्तम सुरवात आहे. केरळासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांना गोल करण्यात अपयश आले आहे. प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की आमचा संघ आगेकूच करण्यासाठी पुरेसे गोल नोंदविण्यासाठी कसून सराव करीत आहे. यशाचा नेमका फॉर्म्युला असत नाही. पहिल्या वर्षी केरळाने केवळ नऊ गोल करून अंतिम फेरी गाठली होती. अर्थात आम्ही अशा कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात नाही. आम्ही अधिकाधिक गोल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षी 20 गोल करूनही आम्ही तळात राहिलो होतो. साहजिकच सरस संतुलनाची गरज अधोरेखित होते. आयएसएलचा आता पहिला टप्पा झाला आहे. कॉप्पेल यांच्यामते आता चुरस वाढेल, कारण उपांत्य फेरी गाठण्यासाठी झुंजणारे संघ जास्त धोका पत्करतील. कॉप्पेल म्हणाले की, पहिल्या टप्यात कदाचित लोकांना हरण्याची भिती वाटत असावी. आता आगेकूच करण्यासाठी जिंकण्याची गरज असल्याचे दुसऱ्या टप्यात त्यांच्या लक्षात आले असावे. सामन्यागणिक मोसमाची सांगता नजिक येतक असल्यामुळे डावपेच बदलतील. दिल्ली जिंकल्यास गुणतक्त्यात आघाडी मिळवेल. पहिले दोन सामने गमावल्यानंतर केरळाला प्रथमच पहिल्या चार संघांत स्थान मिळेल.]]>