चेन्नई, दिनांक 2 नोव्हेंबर 2016: सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना “सुपर सब’ लिओ कॉस्ता याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला 1-1 असे रोखले. मुंबईने गुणतक्त्यातील दुसरे स्थान कायम राखले आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी झालेल्या या लढतीत भारताचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याने 51व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलमुळे यजमान संघाने उत्तरार्धाच्या सुरवातीस आघाडी घेतली होती. चेन्नईयीन एफसी घरच्या मैदानावर मुंबई सिटीविरुद्धची विजयी मालिका कायम राखण्याची शक्यता असताना लिओ कॉस्ता याने 88व्या मिनिटास यजमानांची आघाडी भेदली. सामन्याच्या 61व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या ब्राझीलियन मध्यरक्षकाने सोनी नोर्दे याच्या “असिस्ट’वर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला गुंगारा दिला. गोलरक्षक ड्वेन केर याने चेंडू अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. गोलशून्य पूर्वार्धानंतर जेजे याने 51व्या मिनिटास चेन्नईयीनचे खाते खोलले. त्याचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. मॉरिझिओ पेलुसो याने घेतलेल्या कॉर्नर किकवर गोलरिंगणात जेजे याने चेंडूवर ताबा मिळविला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता जेजे याने गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला चकविले. चेन्नईयीन आणि मुंबई सिटीला आजच्या बरोबरीमुळे प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे मुंबई सिटीने 12 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. ऍटलेटिको द कोलकता संघाचेही 12 गुण झाले आहेत, सरस गोलसरासरीमुळे माजी विजेत्यांचे अव्वल स्थान कायम आहे. एका गुणामुळे चेन्नईयीन एफसीलाही एका क्रमांकाचा फायदा झाला. 10 गुणांसह ते आता पाचव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी आले आहेत. दिल्ली डायनॅमोज व नॉर्थईस्ट युनायटेडचेही प्रत्येकी दहा गुण झाले आहेत, गोलसरासरीवर दिल्ली तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट पाचव्या क्रमांकावर आहे. एका सामन्याच्या निलंबनामुळे चेन्नईयीनची मुख्य प्रशिक्षक मार्को माटेराझी आज संघाच्या “डगआऊट’मध्ये नव्हते. पूर्वार्धाच्या सुरवातीस दोन्ही संघांनी सावध खेळ केला, मात्र उत्तरार्धात चेन्नईयीन एफसी आणि मुंबई सिटीने चमकदार खेळ केला. विशेषतः सामन्याची शेवटची काही मिनिटे बाकी असताना वेगवान खेळ अनुभवायला मिळाला. जेजे लालपेखलुआ याने विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले, भारताच्या या आंतरराष्ट्रीय स्ट्रायकरने पाच मिनिटानंतर अचूक लक्ष्य साधले असते, तर चेन्नईयीनच्या खाती दोन गोलांची आघाडी जमा झाली असती. पूर्वार्धात मुंबई सिटीचा बचाव भक्कम वाटत होता, पण आक्रमणात भेदकता नव्हती. त्यांचा हुकमी एक्का दिएगो फॉर्लान या अनुभवी खेळाडूसही आज विशेष सूर गवसला नाही. सामन्याच्या 23व्या मिनिटाला गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्या चपळाईमुळे मुंबई सिटीवर गोल झाला नाही. चेन्नईयीनच्या मॉरिझिओ पेलुसो याने मारलेल्या फ्रीकिक फटक्यावर चेंडू अडविताना गोलरक्षकाने जबरदस्त चपळाई दाखविली. सामन्याच्या 34व्या मिनिटास पेलुसोच्या फटक्यात भेदकता नव्हती, त्यामुळे चेन्नईयीनला आक्रमणाचा लाभ मिळाल नाही. सामन्याच्या 77व्या मिनिटास मुंबईला बरोबरी साधण्याची सुरेख संधी होती. मात्र गोलरक्षक ड्वेन केर याच्या दक्षतेमुळे यजमानांची आघाडी अबाधित राहिली. दिएगो फॉर्लानच्या फ्रीकिक फटक्यावर गोलरक्षक केर याने चेंडू रोखला खरा, पण रिबाऊंडवर लुसियान गोईयान याचा हेडर क्रॉस बारला आपटल्यामुळे पाहुण्या संघाला बरोबरी साधता आली नाही. त्यापूर्वी एक मिनिट अगोदर चेन्नईयीनच्या डुडू ओमागबेमी याचा फटका मुंबईचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने रोखून यजमानांना आघाडी फुगविण्याची संधी दिली नाही.]]>