मुंबईविरुद्धचे सरस रेकॉर्ड मॅटेराझी यांच्यासाठी आव्हान

चेन्नई, दिनांक 1 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुुपर लिगमध्ये बुधवारी मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात सामना होत आहे. मुंबईविरुद्ध चमकदार कामगिरीचे रेकॉर्ड पाहता संघासमोर मोठे आव्हान असल्याचे चेन्नईयीनचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांना वाटते. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल. आयएसएलला 2014 मध्ये प्रारंभ झाल्यापासून चेन्नईयीनने मुंबईविरुद्ध सर्व चार सामने जिंकले आहेत, पण यावेळी वेगळे निकाल लागत असल्याचे मॅटेराझी यांना दिसून आले आहे. एफसी गोवा आणि चेन्नईयीन यांच्यातील सामन्यात नेहमीच पाहुण्या संघाची सरशी झाली आहे. यात गेल्या मोसमातील अंतिम सामन्याचाही समावेश आहे. यावेळी मात्र चेन्नईयीनने घरच्या मैदानावर गोव्याला हरविले. गोव्याविरुद्ध दिल्लीने यापूर्वी चारही सामने गमावले होते, पण यावेळी मात्र दिल्लीने 2-0 अशी बाजी मारली. इटलीचे विश्वकरंडक विजेते असलेले मॅटेराझी म्हणाले की, दरवर्षी प्रत्येक गोष्ट बदलते. प्रत्येक आयएसएल मागील मोसमाच्या तुलनेत वेगळी होते. या मोसमात प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते आणि मला याचेच दडपण आले आहे. आम्ही गोव्याविरुद्ध घरच्या मैदानावर प्रथमच जिंकलो. मुंबईविरुद्धच्या लढतीसाठी मला म्हणूनच असे वाटते. चेन्नईयीन गुणतक्त्यात सहा सामन्यांतून नऊ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दोन गोलांनी विजय मिळविला तर गतविजेते आघाडी घेऊ शकतात. मॅटेराझी यांना मात्र विजय किंवा बरोबरीची फारशी चिंता वाटत नाही, कारण पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवून उपांत्य फेरीचे त्यांचे पहिले ध्येय आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवायचेच असे नव्हे तर पहिल्या चार संघांमध्ये येणेे त्यांना महत्त्वाचे वाटते. मॅटेराझी यांनी सांगितले की, मला दोन गोलांच्या विजयाची फिकीर वाटत नाही. आम्ही बाद फेरी गाठणे महत्त्वाचे आहे आणि तेच आमचे लक्ष्य आहे. मॅटेराझी यांना जॉन अर्न रिसे आणि हॅन्स मुल्डर यांच्या अनुपस्थितीत संघ निवडावा लागेल. हे दोघे जायबंदी झाले आहेत. मुंबईने मागील स्पर्धांमधील अपयशातून मार्ग काढला असून बाद फेरीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. कोस्टारीकाचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी संघाला जिंकण्याची सवय लावली आहे. चेन्नईयीनविरुद्ध खराब कामगिरीची त्यांना फिकीर वाटत नाही. गुईमाराएस यांनी सांगतिले की, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे आमचा संघ यंदा गेल्या दोन मोसमांपेक्षा वेगळा आहे. पराभवाची कटू आठवण असलेला एकही खेळाडू नाही. ही सर्वस्वी वेगळी स्थिती आहे. आम्ही गतविजेत्यांविरुद्ध खेळत असल्याचे ठाऊक आहे. त्यांच्या संघाला एकत्र खेळण्याची जास्त सवय आहे. मार्की खेळाडू दिएगो फोर्लान उपलब्ध असून त्यामुळे मैदानावर जास्त उत्सुकता निर्माण होईल असे गुईमाराएस यांना वाटते. त्यांनी सांगितले की, तो खेळतो तेम्हा आम्ही बऱ्याचदा जिंकतो. तो खेळतो तेव्हा बऱ्याचदा गोल करतो किंवा संधी तरी निर्माण करतो. तो खेळतो तेव्हा आमच्या प्रतिस्पर्ध्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव असते. हे आमच्यादृष्टिने चांगले आहे. मुबंई सिटी एफसी सात सामन्यांतून 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना आघाडीसाठी विजयाची गरज आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *