मडगाव, दिनांक 24 ऑक्टोबर 2016: केरळा ब्लास्टर्सने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. त्यांनी एफसी गोवा संघाला 2-1 अशा फरकाने नमविले. या पराभवामुळे यजमान संघाची घरच्या मैदानावरील अपराजित मालिका कायम राहिली. फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा संघ पूर्वार्धात एका गोलने आघाडीवर होता. उत्तरार्धात केरळा ब्लास्टर्सने जबरदस्त उसळी घेत विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. ब्राझीलियन ज्युलिओ सीझरने पूर्वार्धात 24व्या मिनिटाला यजमान संघाला आघाडीवर नेले, तर महंमद रफीने 46व्या मिनिटाला पाहुण्या संघास बरोबरी साधून दिली. हैतीचा आंतरराष्ट्रीय “स्ट्रायकर’ केर्व्हन्स बेलफोर्ट याच्या जबरदस्त फटक्यावर केरळाने 84व्या मिनिटास 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सहा मिनिटांच्या इंज्युरी टाईममध्ये त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवत गोव्यात पहिलाच विजय मिळविला. एफसी गोवाचा हा घरच्या मैदानावरील दुसरा सामना होता. यापूर्वी त्यांना याच मैदानावर एफसी पुणे सिटीने 1-2 अशा फरकाने नमविले होते. केरळा ब्लास्टर्स चार सामन्यांत अपराजित आहे. आज तीन गुण मिळवून त्यांनी यंदाच्या दुसऱ्या विजयासह सहा सामन्यांतून गुणसंख्या आठवर नेली आहे. त्यांना पाचवा क्रमांक मिळाला आहे. मागील लढतीत मुंबई सिटीला नमविलेल्या एफसी गोवाला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यांचे सहा लढतीनंतर चार गुण व तळाचा आठवा क्रमांक कायम आहे. सामना संपण्यास सहा मिनिटे असताना बेलफोर्टने नोंदविलेला निर्णायक गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. जोसू कुरैसकडून डाव्या बगलेत बेलफोर्टला मध्यक्षेत्रात चेंडू मिळाला. त्याने नंतर चेंडूवर पूर्ण नियंत्रण राखत दोघा प्रतिस्पर्धी बचावपटूंना गुंगारा देत ताकदवान फटक्यावर गोलरक्षक सुभाशिषला सावरण्याचीही संधी दिली नाही. एफसी गोवाने 24व्या मिनिटाला आघाडी घेतली. ब्राझीलियन ज्युलिओ सीझरच्या भेदक हेडरमुळे एफसी गोवाच्या बहुसंख्य पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. रिचार्लीसनच्या “असिस्ट’वर ज्युलियोने केरळाचा गोलरक्षक संदीप नंदी याचा बचाव भेदला. रिचार्लीसनने डाव्या बगलेतून दिलेल्या चेंडूवर ज्युलिओने स्पर्धेतील आपला पहिला गोल केला. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास केरळा ब्लास्टर्सने बरोबरी साधली. महंमद रफीकच्या “असिस्ट’वर महंमद रफीने 46व्या मिनिटाला एफसी गोवाचा गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरीला चकविले. रफीकला उजव्या बगलेत आवश्यक जागा मिळाली. त्याने चेंडू नियंत्रित केला, नंतर गोलरिंगणाता अप्रतिम क्रॉस पास दिला. यावेळी गोलरिंगणात असलेल्या रफीने एफसी गोवाचा बचावपटू राजू गायकवाड चेंडूवर ताबा मिळविण्यापूर्वीच चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. पूर्वार्धातील पहिल्या वीस मिनिटांच्या खेळात केरळाने धारदार आक्रमण रचत एफसी गोवाच्या बचावफळीवर दबाव टाकला. तुलनेत यजमान संघाचा खेळ संथच होता. पहिल्या 45 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा एफसी गोवाच्या खाती आघाडी होती, त्याचवेळी केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक स्टीव कोपेल यांना गमावलेल्या संधी सलत होत्या. सामन्याच्या 15व्या मिनिटाला केरळास आघाडी घेण्याची संधी होती. केर्व्हन्स बेलफोर्टच्या शानदार पासवर रफीचा फटका चुकीच्या दिशेने गेले. 18व्या मिनिटाला केर्व्हन्स बेलफोर्टला अचूक फटका मारणे जमले नाही. नंतर 21व्या मिनिटाला मेहताब हुसेनच्या फ्रीकिकवर गोलरक्षक सुभाशिषने जागा सोडली होती, यावेळी रफीक चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. 36व्या मिनिटाला केरळला पुन्हा एकदा गोल करण्यात अपयश आले. जोसू कुरैस याच्या फ्रीकिकवर संदेश झिंगानने उंचावत हेडर साधला होता, परंतु दक्ष सुभाशिषने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यामुळे सामन्यातील दुसरा गोल ब्राझीलयन खेळाडूच्या नावावर जमा झाला नाही. एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांनी उत्तरार्धातील खेळात बचाव अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने होफ्रे गोन्झालेझ याला माघारी बोलावून लुसियोला मैदानात धाडले. एफसी गोवाने 63व्या मिनिटास जवळपास आघाडी घेतली होती. मात्र केरळाचा गोलरक्षक संदीप नंदीने ज्युलियो सीझरचा फटका यशस्वी होऊ दिला नाही. सामन्याच्या 76व्या मिनिटाला एफसी गोवाने आक्रमणातील व्यूहरचना बदलली. विशेष सूर न गवसलेला स्ट्रायकर रॉबिन सिंग याच्या जागी “विंगर’ मंदार राव देसाई याला पाठविण्यात आले. त्यानंतर आणखी एक स्थानिक खेळाडू रोमिओ फर्नांडिसने प्रतेश शिरोडकरची जागा घेतली. सामन्याच्या 80व्या मिनिटाला गोलरक्षक संदीप नंदीच्या थेट फ्रीकिकवर केरळा ब्लास्टर्सच्या मायकेल परेरा याचा कमजोर फटका एफसी गोवाचा गोलरक्षक सुभाशिष याने अडविला.]]>