कोलकता, दिनांक 16 ऑक्टोबर 2016: अतिशय उत्कंठावर्धक आणि अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात एफसी गोवा संघाने ऍटलेटिको द कोलकता संघाला बरोबरीत रोखून हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पहिला गुण प्राप्त केला. येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर झालेला सामना 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. कोलकत्याच्या स्टीफन पियरसनला 53व्या, तर एफसी गोवाच्या संजय बालमुचू याला 61व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले. सामन्याच्या सहाव्या मिनिटास सामिग दौती याने कोलकत्यास आघाडीवर नेले, नंतर पेनल्टी फटक्यावर 77व्या मिनिटास होफ्रे गोन्झालेझ याने एफसी गोवाला बरोबरी साधून दिली. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. ऍटलेटिको द कोलकताची ही चार सामन्यांतील तिसरी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे सहा गुण झाले आहेत. होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखालील संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर एफसी गोवा संघाला पहिला गुण मिळाला. विश्रांतीनंतरच्या आठव्या मिनिटास कोलकत्याच्या स्टीफन पियरसन याला रेड कार्ड मिळाले. त्याने एफसी गोवाच्या त्रिनदाद गोन्साल्विस याला धोकादायकरीत्या अडथळा आणला. यावेळी रेफरींनी थेट रेड कार्ड दिल्यामुळे कोलकत्याला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यानंतर 61व्या मिनिटास एफसी गोवा संघाचाही एक खेळाडू कमी झाला. संजय बालमुचू याला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले. कोलकत्याच्या प्रबीर दास याला अडथळा आणल्याप्रकरणी संजयला सामन्यातील दुसरे यलो कार्ड दाखविण्यात आले. त्यावेळी मिळालेल्या फ्रीकिकवर लारा ग्रान्डे अचूक फटका मारू शकला नाही. एफसी गोवास अखेर 77व्या मिनिटास यश मिळाले. होफ्रे गोन्झालेझने पेनल्टी फटक्यावर पाहुण्या संघास बरोबरी साधून दिली. होफ्रेच्या कॉर्नरवर गोलरिंगणात चेंडू कोलकत्याच्या बोर्जा फर्नांडेझ याच्या हाताला लागला. यावेळी रेफरींनी थेट पेनल्टी फटक्याची खूण केली. होफ्रेने गोलरक्षक देबजित मजुमदारला चकवून चेंडूला गोलजाळीच्या उजव्या कोपऱ्याची दिशा दाखविली. कोलकताने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकन सामीग दौती याच्या अप्रतिम फटक्यामुळे कोलकत्यास घरच्या मैदानावर खाते उघडता आले. हावियर लारा ग्रान्डे याच्या फ्रीकिकवर इयान ह्यूमचा प्रयत्न एफसी गोवाच्या राजू गायकवाडने रोखला, परंतु चेंडू गोलरिंगणाबाहेर असलेल्या दौती याच्याकडे गेला. त्याने उजव्या पायाच्या जबरदस्त फटक्यावर गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरीच्या डोक्यावरून चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. एफसी गोवाने धारदार खेळ केला खरा, परंतु सदोष नेमबाजीमुळे त्यांना पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात यश मिळाले नाही. सामन्याच्या 13व्या मिनिटास राफाएल कुएल्होने गोलरिंगणात क्रॉसपास दिला, परंतु होफ्रे गोन्झालेझला वेळीच चेंडूवर ताबा राखता आला नाही. त्यानंतर 16व्या मिनिटास कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या दक्षतेमुळे पाहुण्या संघाला बरोबरी साधता आली नाही. राफाएल कुएल्होने मध्यक्षेत्रातून दिलेल्या चेंडूवर त्रिनदाद गोन्साल्विसने चेंडू नियंत्रित केला. समोर फक्त गोलरक्षक असताना त्रिनदादने फटका मारला, मात्र देबजितने चपळाईने हा फटका अडविला. 19व्या मिनिटाला कोलकत्याच्या ग्रान्डे याचा फटका दिशाहीन ठरल्यामुळे त्यांची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. 27व्या मिनिटाला एफसी गोवाला पुन्हा सदोष नेमबाजी नडली. कॉर्नर किकवर होफ्रे याचा फटका थेट गोलरक्षकाच्या हाती गेला. त्यानंतर लगेच दोन मिनिटांनी रॉबिन सिंगचा फटका भरकटल्यामुळे गोव्याची पिछाडी कायम राहिली. विश्रांतीला पाच मिनिटे असताना रॉबिन सिंगचा प्रयत्न गोलरक्षक देबजितने विफल ठरविला. वारंवार संधी हुकत असल्यामुळे एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झिको यांच्या चेहऱ्यावरील हताश भावही स्पष्ट झाले होते. गोव्याने उत्तरार्धात बरोबरी साधल्यानंतर 81व्या मिनिटास कोलकत्याच्या दौतीने प्रतिस्पर्धी संघातील दोघा बचावपटूंना गुंगारा दिला होता, मात्र ग्रेगरी अर्नोलिनने वेळीच चेंडूची दिशा बदलून संघावरील संकट टाळले. सामना संपण्यास चार मिनिटे असताना एफसी गोवाची आघाडी घेण्याची चांगली संधी वाया गेली. ज्युलियो सीझरने कोलकत्याचा बचाव भेदत गोलरिंगणात भेदक क्रॉसपास दिला, मात्र होफ्रे चेंडूवर वेळीच ताबा राखू शकला नाही. 88व्या मिनिटाला एफसी गोवाला फ्रीकिक मिळाली. होफ्रेचा फटका गोलरक्षक मजुमदारने वेळीच रोखला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये कोलकत्याची चांगली संधी वाया गेल्यामुळे गोलफरक 1-1 असा बरोबरीत राहिला. कोलकत्याच्या सामीग दौती याने एफसी गोवाचा बचावपटू राफाएल दुमास याला चकवा दिला. यावेळी निराश झालेल्या दुमासने दौतीला मागून ओढले, त्यामुळे त्याला यलो कार्ड मिळाले. कोलकत्यास फ्रीकिक मिळाली. हावियर लारा ग्रान्डे याचा फटका भेदक ठरला नाही.]]>