घरच्या मैदानावर कामगिरी उंचावण्याचे आव्हान पुणे, दिनांक 16 ऑक्टोबर 2016: एफसी पुणे सिटीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सोमवारी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर अपयशी मालिका सुरु असल्यामुळे पुणे सिटीसमोर चिंतेचे वातावरण आहे. त्यातून सावरून कामगिरीत सातत्य आणण्याचे आव्हान यजमान संघासमोर आहे. मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांचे निलंबन या लढतीनंतर संपुष्टात येईल. त्यांच्या गैरहजेरीत पूर्वतयारी पुरेशी झाल्याचे सहायक प्रशिक्षक मिग्युएल यांनी ठामपणे सांगितले. पहिले चार सामने हबास निलंबित आहेत. त्यांच्या गैरहेजेरीत पुणे सिटीची मोहीम व्यवस्थित सुरु झालेली नाही. तीन सामन्यांत त्यांचे केवळ तीन गुण जमले आहेत. घरच्या मैदानावर त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत. एफसी गोवाविरुद्ध गोव्यातील सामन्यात अखेरच्या मिनिटाला गोल करून बाजी मारल्यानंतर पुणे सिटीचे मनोधैर्य उंचावले होते. घरच्या मैदानावर मात्र त्यांना अद्याप एकही गुण मिळविता आलेला नाही. महाराष्ट्र डर्बीत त्यांना मुंबई सिटी एफसीकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धही पुणे सिटीचा पराभव झाला. मिग्युएल यांनी सांगितले की, आम्हाला सर्व क्षेत्रांत कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. मी एकाच क्षेत्राचा उल्लेख करू शकत नाही, अनेक बाबींत सुधारणा हवी आहे, पण हे आमचे कामच आहे. आम्ही कसून सराव करीत असून सुधारणा करू. पुणे सिटीला एदुआर्दो फरेरा यास मुकावे लागेल. नॉर्थईस्टविरुद्ध त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे बचावाची जबाबदारी मार्की खेळाडू महंमद सिस्सोको याच्यावर सोपविण्यात आली. लिव्हलपूरच्या या माजी मध्यरक्षकाने समाधानकारक कामगिरी पार पाडली. मिग्युएल यांनी सांगितले की, सिस्सोकोने मध्यवर्ती बचावपटू तसेच मध्यवर्ती मध्यरक्षक अशा दोन्ही ठिकाणी चांगला खेळ केला. त्याची कामगिरी चांगली होत आहे. हबास यांचे निलंबन या सामन्यानंतर संपुष्टात येत आहे, पण स्टेडियममध्ये बसून आपल्या संघाचा खेळ पाहणे त्यांच्यासाठी अवघड आहे. केरळा ब्लास्टर्सचा आत्मविश्वास पहिल्या विजयानंतर उंचावला आहे. त्यातही त्यांनी मुंबई सिटी एफसीची घोडदौड रोखली. चौथ्या फेरीच्या या लढतीपूर्वी केरळा संघ झगडत होता, पण उत्तरार्धात मायकेल चोप्राने गोल केला आणि नाट्यमय रितीने चित्र बदलले. केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, लक्ष्य ठरविण्यावर माझा विश्वास नाही. एका वेळी एका सामन्याचे नियोजन करायचे आणि तो जिंकायचा प्रयत्न करायचा असे माझे धोरण असते. अॅटलेटीको डी कोलकाताविरुद्ध खेळाडूच्या अंंगाला लागून चेंडू आत गेल्यामुळे आमच्यावर गोल झाला. हे अत्यंत दुर्दैवी होते, पण शेवटी जो काही निकाल लागतो त्यामुळे फरक पडतो. शेवटी खेळात असेच होते. आता कमी कालावधीत बरेच सामने खेळावे लागतील. त्यामुळे आम्हाला शक्य तेवढे गुण कमवावे लागतील. संघाला फॉर्म गवसल्यावर आम्ही जिंकत राहू. केरळाने सलग दोन सामन्यांत प्रतिस्पर्ध्याचा गोल होऊ दिलेला नाही. मार्की खेळाडू अॅरॉन ह्युजेस आणि सेड्रीक हेंगबार्ट यांची मध्यवर्ती बचाव फळीत जमलेली जोडी केरळासाठी उत्साहवर्धक आहे. हे दोघेही फॉर्मात आहेत.]]>