नवी दिल्ली, दिनांक 15 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दिल्ली डायनॅमोजला शनिवारी घरच्या मैदानावर बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांना नॉर्थईस्ट युनायटेड क्लबने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. सामना रंगतदार आणि अटीतटीचा ठरला. दिल्ली डायनॅमोजला 38व्या मिनिटाला केन लुईस याने आघाडीवर नेले, तर 51व्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडचा हुकमी खेळाडू एमिलियानो अल्फारो याने संघासाठी बरोबरीचा गोल केला. बरोबरीचा एक गुण मिळाल्यामुळे नॉर्थईस्टचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. त्यांचे पाच सामन्यांतून दहा गुण झाले आहेत. स्पर्धेतील त्यांची ही पहिलीच बरोबरी होती. दिल्लीचे तीन सामन्यांतून पाच गुण झाले आहेत. त्यांची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी असून त्यांना मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. दिल्ली डायनॅमोज संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटाला नॉर्थईस्टने बरोबरी साधली. अल्फारो याने स्पर्धेतील आपला चौथा गोल नोंदवून दिल्लीची आघाडी भेदली. यावेळी दिल्लीला रूबेन रोचा याची चूक नडली. त्याच्याकडून निकोलस वेलेझने उजव्या बगलेत चेंडूवर ताबा मिळविला. गोलरक्षकाला स्वतःकडे आकर्षित केल्यानंतर त्याने झटकन अल्फारोस पास दिला. उरुग्वेच्या खेळाडूचा आक्रमक फटका दिल्लीचा बचावपटू चिंग्लेसामा कोन्शाम याने अडविला, मात्र चेंडू पुन्हा अल्फारोकडे आला. यावेळी त्याने चेंडूला गोलजाळीत मारताना अजिबात चूक केली नाही.चेंडू चिंग्लेसानाच्या पायामधून गोलरेषा पार करून केला. सामन्याचा पूर्वार्ध खूपच आक्रमक ठरला. दोन्ही संघांना मिळून एकूण पाच यलो कार्डस् मिळाली. विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना दिल्लीने केन लुईसच्या गोलमुळे आघाडी घेतली. मार्सेलिन्होच्या कॉर्नरवर नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉलने जागा सोडली, ही संधी साधून केन लुईसने दिल्लीला आघाडीवर नेले. पूर्वार्धात दिल्लीने आघाडी घेतली असली, तर नॉर्थईस्टच्या निकोलस वेलेझ, एमिलियानो अल्फारो व कात्सुमी युवा या त्रिकुटाने दिल्लीच्या बचावफळीवर दबाव कायम राखला होता. सुब्रत पॉलच्या दक्ष गोलरक्षणामुळे दिल्लीच्या आक्रमणांनाही विशेष वाव मिळाला नाही. सामन्याच्या 25व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या युसा याला यश मिळाले नाही. होलिचरण नरझारी व युसा यांनी सुरेख चाल रचली, मात्र जपानी खेळाडूचा फटका अगदी थोडक्यात हुकला. सामन्याच्या 19 व्या मिनिटास नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉलने मिलन सिंगचा प्रयत्न उधळून लावला. अल्फारोस 62व्या मिनिटास आणखी एक संधी होती. त्याने दिल्लीचा बचाव भेदला होता. अल्फारोने दिल्लीच्या गोलरक्षकालाही गुंगारा दिला, यावेळी दिल्लीचा बचावपटू रूबेन गोन्झालेझ रोचाही अल्फारोच्या बरोबरीने धावत होता, त्यामुळे गडबडीत मारलेला फटका गोलपट्टीस आपटला. बरोबरीनंतर दिल्लीने आघाडीच्या गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. 66व्या मिनिटास लुईसचा प्रयत्न गोलरक्षक पॉलने विफल ठरविला. 71व्या मिनिटास दिल्लीच्या मार्सेलो परेरा याने खोलवर मुसंडी मारली. त्याने रिचर्ड गॅडझे याला क्रॉस पास दिला, परंतु प्रतिस्पर्धी गोलरक्षक पॉल दक्ष होता. त्यानंतर 76व्या मिनिटास मार्सेलोला यश आले नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममधील पाच मिनिटांच्या खेळातही दिल्लीला गोलबरोबरीची कोंडी फोडता आली नाही. रिचर्ड गॅडझे याने हेडरद्वारे दिलेल्या चेंडूला फ्लोरेन्ट मलोडा याने चेंडू नियंत्रित केला, परंतु त्याचा फटका दिशाहीन ठरला.]]>