मुंबई, दिनांक 7 ऑक्टोबर 2016: कर्णधार दिएगो फॉर्लानच्या अचूक पेनल्टी गोलच्या बळावर शुक्रवारी मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. अंधेरीत पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईने नॉर्थईस्ट युनायटेडची विजयी मालिका खंडित केली. घरच्या मैदानावर त्यांनी एका गोलने विजय नोंदविला. सामन्यातील निर्णायक गोल फॉर्लानने 55व्या मिनिटाला नोंदविला. मुंबई सिटीने अगोदरच्या लढतीत पुणे सिटीला हरविले होते. आजच्या पूर्ण तीन गुणांमुळे अलेसांड्रे ग्युमारेस यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता सहा गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्स आणि एफसी गोवा संघाला गुवाहाटीत पराजित केलेल्या नॉर्थईस्टला आज “अवे’ मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे तीन लढतीनंतर सहा गुण कायम राहिले. उत्तरार्धाच्या सुरवातीस पेनल्टी गोलवर मुंबई सिटीने आघाडी घेतली. उरुग्वेचा “सुपरस्टार’ फॉर्लान याने अचूक नेमबाजी केली. मुंबई सिटीच्या कर्णधाराचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल ठरला. नॉथईस्ट युनायटेडचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने फटका रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग त्याच्या आवाक्यापलीकडचे ठरला. नॉर्थईस्ट युनाटडने यंदाच्या स्पर्धेत स्वीकारलेला हा पहिलाच गोल होता. मुंबईच्या प्रणय हल्दर याने नॉर्थईस्टचा बचावपटू रीगन सिंग याच्याकडून चेंडू घेत गोलरिंगणात मुसंडी मारली, पण प्रणयला यावेळी पाडण्यात आले व रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केली. पिछाडीनंतर नॉर्थईस्टने गोलबरोबरीसाठी वारंवार प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. 71व्या मिनिटाला बदली खेळाडू होलीचरण नरझारी याच्या शानदार क्रॉसपावर निकोलस व्हेलेझने अचूक हेडर साधू शकला नाही. सामन्याच्या 77व्या मिनिटाला नॉर्थईस्टने मुंबईच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली होती. एमिलियानो अल्फारो याने अप्रतिम चाल रचली. त्याने मुंबईच्या दोघा बचावपटूंना चकवून कात्सुमी युसा याला संधी प्राप्त करून दिली, परंतु जपानी खेळाडूने अगदीच कमजोर फटका मारला, जो मुंबईच्या गोलरक्षकाने आरामात अडविला. पूर्वार्धातील खेळात एकही गोल झाला नाही. तुलनेत मुंबई सिटीने पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात वर्चस्व राखले, पण त्यांचे खेळाडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉल याचा बचाव भेदू शकले नाहीत. मुंबईचा गोलरक्षक रॉबर्टो नेटो यानेही दक्षता दाखविली. सामन्याच्या 15व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा कोफी ख्रिस्तियन एनद्री याला चांगला संधी होती, परंतु तो मुंबई सिटीच्या नेटो याचा बचाव भेदू शकला नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत याने मुंबईचे आक्रमण विफल ठरविले. मुंबईच्या ऐबोर्लांग खोन्गजी याने दूरवरून मारलेल्या फटक्यावर सुब्रतने चेंडूवरील नजर ढळू दिली नाही. 21व्या मिनिटाला मुंबईचा गोलरक्षक नेटो याने पुन्हा एकदा कोफी ख्रिस्तियन याचा प्रयत्न हाणून पाडला. विश्रांतीला पाच मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टने लाखमोलाची संधी गमावली. निकोलस व्हेलेझ याने दिलेल्या पासवर कात्सुमी युसा याला अचूक नेमबाजी करता आली नाही. समोर फक्त गोलरक्षक नेटो असताना जपानी खेळाडूने खूपच उंचावरून फटका मारला.]]>