पणजी, दिनांक 7 ऑक्टोबर 2016: एफसी गोवा संघाची हिरो इंडियन सुपर लिगच्या तिसऱ्या मोसमात घरच्या मैदानावरील पहिली लढत शनिवारी होत आहे. त्यांच्यासमोर एफसी पुणे सिटीचे आव्हान असेल. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन्ही संघांना गुणांचे खाते उघडण्याची प्रतिक्षा असेल. एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक झिको यांना आपला संघ घरच्या मैदानावर पारडे फिरविण्याचा विश्वास आहे. एफसी गोवा संघाला सलामीच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध प्रथमच पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मोसमातील पहिला विजय मिळविण्यासाठी आपल्या संघाला झिको यांनी आता प्रेरित करण्याची गरज आहे. नॉर्थईस्टविरुद्ध गोवा संघाचा खेळ काही वेळा चांगला झाला, पण त्यात सातत्याचा अभाव होता. त्यांना गोल करता आला नाही, पण झिको यांचा संघाच्या झुंजार खेळाच्या क्षमतेवर विश्वास आहे. झिको यांनी सांगितले की, आम्ही चांगला खेळ केला, आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले. आम्ही झुंज दिली, पण नॉर्थईस्टवर मात करू शकलो नाही. ही स्पर्धेच केवळ सुरवात आहे. पहिल्या वर्षी सुद्धा आमची सुरवात पराभवाने झाली, पण आम्ही त्यातून सावरलो. यावेळी सुद्धा आम्हाला तसेच प्रयत्न करावे लागतील. गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या चुकीमुळे नॉर्थईस्टचा पहिला गोल झाला. दुसऱ्या गोलमुळे सुद्धा बचावाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिेले. झिको मात्र यामुळे गडबडून गेलेले नाही. ते संघाच्या अव्वल गोलरक्षकाचे स्थान कायम ठेवणार आहेत. गोव्याच्या गोलरक्षकाबाबत ते म्हणाले की, गेले दोन मोसम कट्टीमनीला आमच्यासह खेळण्याचा बराच अनुभव मिळाला आहे. आम्ही एकत्र खेळत आहोत. जेव्हा आम्ही हरतो तेव्हा प्रत्येक जण हरलेला असतो. कुणा एका खेळाडूचा यात दोष नसतो. झिको संघाच्या स्वरुपात बदल करणार की अंतिम संघात नव्या खेळाडूंचा समावेश करणार हे अद्याप स्पष्ट नाही. अनेक खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे त्यांच्यासमोर फारसे पर्यायही नाहीत. ग्रेगरी अर्नोलीन, ल्युसियानो सोब्रोसा, रॉबीन सिंग, डेन्झील फ्रँको आणि शुभाशिष रॉयचौधरी हे जायबंदी आहेत. ही लढत ते खेळू शकणार नाहीत. एफसी पुणे सिटी संघासमोर दुखापतींचा अडथळा नाही. सहायक प्रशिक्षक मिग्युएल यांना खाते उघडण्याचा विश्वास वाटतो. ते म्हणाले की, आमचे बहुतांश खेळाडू नवे आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. अशाप्रकारे संघ बांधणे सोपे नसते. आम्हाला आणखी काही सामने खेळावे लागतील. मग संघाची कामगिरी सुधारेल. मुख्य प्रशिक्षक अँटोनीओ हबास पहिल्या चार सामन्यांसाठी निलंबीत आहेत. मार्की खेळाडू ऐडुर गुडीजॉन्सन याला मोसमपूर्व शिबीरात दुखापत झाली. त्यामुळे त्यास आयएसएलला मुकावे लागले आहे. परिणामी पुणे सिटीच्या पूर्वतयारीला मोठा हादरा बसला. त्याच्याऐवजी लिव्हरपूलचा माजी मध्यरक्षक महंमद सिस्सोको याची निवड झाली आहे. तो निवडीसाठी उपलब्ध असेल. मिग्युएल यांनी सांगितले की, ऐडूरच्या दुखापतीचा परिणाम झाला. तो नेतृत्वकौशल्य असलेला तसेच मातब्बर खेळाडू आहे, पण आता आम्ही दुसरा मार्की खेळाडू आणला आहे. ही भूमिका तो पार पाडेल. तो हा सामना खेळून ऐडूरची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करेल. एफसी पुणे सिटीच्या सलामीच्या फेरीत महाराष्ट्र डर्बीच्या लढतीत मुंबई सिटी एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले.]]>