मार्गदर्शन करतांना वैद्य उदय धुरी. कोपरखैरणे – राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारत यांतील वचनांनी घडवले. श्रीरामाने सीतेला सोडवण्यासाठी वानरांचे संघटन केले आणि रावणाच्या राज्यात घुसून त्याचा वध केला. श्रीकृष्णानेही कंसाचे अत्याचार थांबवण्यासाठी त्याच्याच राजवाड्यात त्याला ठार मारले. अशा उदाहरणांतून बोध घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनीही अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. शाहिस्तेखानाच्या शमियानात घुसून त्याची बोटे छाटली. औरंगजेबाच्या दरबारात त्याला मुजरा न करता ते आग्रा येथील औरंग्याच्या बंदीवानातून सुखरूप बाहेर पडले. ही सर्व शिकवण जिजाऊंनीच त्यांना दिली अन् त्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहिल्या. महिलांनी जिजाऊंचा आदर्श ठेवून आपल्याही मुलास छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे घडवावे आणि हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार करावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी केले. येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठानद्वारे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात हळदी-कुंकवाच्याही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख श्री. भरत माळी, हिंदु महासभेचे श्री. रमेश पावगे, युवा मित्र सेनेचे सर्वश्री मंगेश खाटपे, महेश थोरात, शिव-शंभू प्रतिष्ठानचे श्री. सागर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट गगनभेदी घोषणा आणि भव्य भगव्या वाहन फेरीने करण्यात आला.]]>