जिल्ह्यातील 96 कोटी रुपये खर्चाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते भुमिपुजन

बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्याच्या 82 गावांमधील नागरीकांना 12 रुपयांत एक हजार लिटर जंतुविरहित पाणी मिळणार जळगाव:  मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील 48 गावांना, भुसावळ तालुक्यातील 31 गावांना तर मुक्ताईनगर तालुक्यातील 3 गावांना येत्या दीडवर्षात अवघ्या 12 रुपयांत एक हजार लिटर जंतुविरहित पाणी मिळणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत बोदवड येथे 51 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन ना. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे,जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मुमताज बागवान, बोदवड पंचायत समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती दिपाली राणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, भानुदास गुरसळ, वर्षाताई पाटील, किशोर गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस. जी. कालिके, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, तहसीलदार थोरात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भोसले यांचेसह नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाणीपुरवठा मंत्री ना. लोणीकर म्हणाले की, राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत राज्यात 2500 कोटी रुपये खर्चाची कामे सुरु आहे. देखभाल व दुरुस्ती अभावी राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या तसेच अनेक योजना अपुर्ण अवस्थेत होत्या. राज्य शासनाने या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 130 कोटी रुपयांची तरतुद केली असून त्यापैकी 45 कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. ही योजना पूर्ण् झाल्यांनतर या गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी मिटणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जळगाव जिल्हयासाठी 453 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून यामध्ये 108 कोटी रुपये शौचालयांची निर्मिती करण्यासाठी तर मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्हयातील 71 योजनांसाठी 170 कोटी रुपये दिले असल्याचे सांगून श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा नारा दिला. राज्यातील 56 लाख कुटूंब उघड्यावर शौचास बसत होते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या शासनाने स्वच्छ महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या कुटूंबांना शौचालय बांधून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी प्रत्येकी 12 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात राज्यातील 17 जिल्हे, 234 तालुके, 24 हजार ग्रामपंचायती तर 34 हजार गावे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. तर येत्या सहा महिन्यात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलतांना माजीमंत्री आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, बोदवड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून तालुक्यातील दुष्काळ व टंचाई दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्यावतीने तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी खासदर रक्षाताई खडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री. कालीके यांनी या योजनेचा आराखडा तयार करताना 2038 मधील लोकसंख्येचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या योजनेची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ना. लोणीकर यांच्या हस्ते 45.52 लाख रुपये खर्चाच्या बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील 51 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन या योजनेचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी बोदवड नगरपंचायतीच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरपंचायतीचे नगरसेवक, विविध गावांचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ना. लोणीकर यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे 33 कोटी 74 लाख रुपये खर्चाच्या 31 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन या योजनेचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह तळवेलचे सरपंच सुनील पाटील हे उपस्थित होते. तर भुसावळ तालुक्यातील खडका येथे 16 कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या निमशहरी खडके पाणी पुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करुन भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह माजी आमदार दिलीप भोळे, यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *