"टेन मेन" एफसी गोवाचा झुंजार विजय "स्टॉपेज टाईम" मधील रोमिओच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडला नमविले

मडगाव, दिनांक 11 नोव्हेंबर 2016: सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये रोमिओ फर्नांडिसने नोंदविलेल्या गोलमुळे शेवटची 18 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत झुंजार विजय मिळविला. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडवर 2-1 असा विजय मिळवून पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड केली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात गोलशून्य पूर्वार्धानंतर तिन्ही गोल उत्तरार्धाच्या खेळात झाले. सामन्याच्या 50व्या मिनिटाला सेईत्यासेन सिंग याने नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी मिळवून दिली, तर 62व्या मिनिटास रॉबिन सिंगने एफसी गोवा संघाला बरोबरी साधून दिली. 72व्या मिनिटाला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे साहिल तावोरा याला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे अखेरच्या 18 मिनिटांत एफसी गोवाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. संघाचे आज नेतृत्व करणारा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याची दक्ष कामगिरीही एफसी गोवासाठी आज मौल्यवान ठरली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. चार मिनिटांच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये रॉबिन सिंगच्या “असिस्ट’वर रोमिओने गोलबरोबरीची कोंडी फोडली. संजय बालमुचू याने दिलेल्या चेंडूवर रॉबिन सिंगने खोलवर चढाई केली. त्यानंतर रोमिओकडे चेंडू पास केला. रोमिओने गोलरक्षक सुब्रत पॉलला चकवा देत शांतपणे एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुवाहाटी येथे स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात नॉर्थईस्टने एफसी गोवाला 2-0 असे हरविले होते. आजच्या विजयाच्या पूर्ण तीन गुणांमुळे एफसी गोवाचे 10 गुण झाले. त्यांचा हा दहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला. गोलसरासरीवर त्यांना आठव्या क्रमांकावर राहावे लागले आहे. नॉर्थईस्ट युनायटेडला सलग चौथा पराभव पत्करावा लागला. एकंदरीत पाचव्या पराभवामुळे त्यांचे नऊ सामन्यानंतर 10 गुण आणि सहावे स्थान कायम आहे. चौघा खेळाडूंचे निलंबन, तसेच अन्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांच्याकडे संघ निवडीसाठी 15 खेळाडूच उपलब्ध होते. निलंबनामुळे ग्रेगरी अर्नोलिन, रिचार्लीसन फेलिस्बिनो, लुसियानो साब्रोसा व राफाएल दुमास हे खेळाडू एफसी गोवासाठी उपलब्ध नव्हते. हा संघ आज मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या संघात ब्राझीलियन त्रिनदाद गोन्साल्विस व राफाएल कुएल्हो हेच परदेशी खेळाडू होते. गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने संघाचे नेतृत्व केले. नॉर्थईस्टला त्यांचा हुकमी स्ट्रायकर एमिलियानो अल्फारो याची निलंबनामुळे अनुपस्थिती जाणवली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. नॉर्थईस्टने सामन्यावर वर्चस्व राखले, परंतु सदोष नेमबाजीमुळे त्यांना पूर्वार्धातील खेळात आघाडी घेणे जमले नाही. त्यांच्यासमोर गोलरक्षक कट्टीमनीचा भक्कम बचाव होता. एफसी गोवा संघानेही काही आक्रमक चाली रचल्या. नॉर्थईस्टच्या रॉवलिन बोर्जिसला कट्टीमनीला गुंगारा देणे जमले नाही. एफसी गोवाच्या गोलरक्षकाची आजची कामगिरी दृष्ट लागण्याजोगी ठरली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला त्याने प्रतिस्पर्ध्यांचे अगदी जवळून आक्रमण फोल ठरविल्यानंतर पूर्वार्धातील खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाला यश मिळू दिले नाही. यजमान संघाच्या रॉबिन सिंगचा फटका अडविल्यामुळे एफसी गोवालाही आघाडी घेणे जमले नाही. विश्रांतीनंतरच्या पाचव्याच मिनिटाला नॉर्थईस्टने आघाडी घेतली. कास्तुमी युसाच्या डाव्या बगलेतील कॉर्नर किकवर एफसी गोवाच्या रॉबिन सिंगने हेडरने चेंडू दिशाहीन करण्याच्या प्रयत्न केला, परंतु पाहुण्या संघाच्या सेईत्यासेन सिंगला मिळाला. त्याने सुरेख कौशल्य प्रदर्शित करत चेंडू नियंत्रित केला आणि फटका मारला. यावेळी चेंडूने एफसी गोवाच्या त्रिनदाद गोन्साल्विस याच्या शरीरास स्पर्श केला. त्यामुळे गोलरक्षक कट्टीमनीचा अंदाज चुकला, परिणामी नॉर्थईस्टला आघाडी मिळाली. पाहुण्या संघाची आघाडी जास्तवेळ टिकली नाही. रॉबिन सिंगने आणखी बारा मिनिटांनंतर यजमान संघाला बरोबरी साधून दिली. यावेळी त्रिनदाद गोन्साल्विसने हेडद्वारे रोमियो फर्नांडिसला चेंडू पुरविला. गोव्याच्या युवा “विंगर’ने प्रतिस्पर्धी बचावपटू होलिचरण नरझारी याला गुंगारा देत गोलपोस्टसमोर रॉबिन सिंगच्या ताब्यात चेंडू दिला, यावेळी भारताच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रायकरने अप्रतिम फटक्‍यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुब्रत पॉलचा बचाव भेदला. सामन्याच्या 72व्या मिनिटाला एफसी गोवा संघाचा एक खेळाडू कमी झाला. साहिल तावोरा आणि होलिचरण नरझारी यांच्यातील चढाओढीत साहिलने होलिचरणला मागून ओढत पाडले. यावेळी रेफरींनी एफसी गोवाच्या खेळाडूस यलो कार्ड दाखविले. अगोदर 53व्या मिनिटास पहिले यलो कार्ड मिळालेल्या साहिलला मैदान सोडावे लागले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *