नेस्ले (मँगी) विरोधात नवी मुंबईत मनसेचे आंदोलन

नवी मुंबई (बाबाजी गोडसे ) – लोकांच्या जीवाशी खेळ करणार्‍या नेस्ले मॅगी विरोधात संपूर्ण देशभरात रान उठले असताना, आज नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील नेस्ले मॅगी विरोधात मोहीम उघडली आहे. येत्या दोन दिवसांत नवी मनसेचे विभाग, उपविभाग व शाखा अध्यक्ष नवी मुंबईतील मॉल्स, किरकोळ दुकानदार व पुरवठादार यांना नेस्ले मॅगी न विकण्याची मागणी लेखी पत्राद्वारे करणार आहेत. या पत्रानंतर नेस्ले मॅगीची विक्री सुरु ठेवल्यास नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी दुकानदारांना काही देणं-घेणं नाही असे समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ही विक्री थांबवेल असा सूचक इशारा देखील नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दुकानदारांना लिहिलेल्या पत्रात दिला. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.परोपकारी यांची देखील गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज भेट घेऊन सदर विषयासंदर्भात निवेदन सादर केले. महाराष्ट्र सरकारने नेस्ले मॅगीचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या तसेच पुण्यातील राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा तपासणी अहवालही लवकरच येणार आहे. मात्र तोवर या विषयाचे गांभीर्य पाहून व लोकांच्या जीवाशी निगडीत विषय असल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी नेस्ले मॅगीची विक्री बंद करण्याचे लेखी आदेश सर्व व्यावसयिक आस्थापनांना द्यावेत तसेच कुठल्याच विक्रेत्याने नेस्ले मॅगीचा साठा ठेऊ नये व त्याची विक्री करू नये असे देखील या आदेशात नमूद करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे. वाशी येथील इनऑर्बिट मॉल व रघुलीला मॉल येथे स्वतः शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी भेट देऊन मॉल व्यवस्थापनाला नेस्ले मॅगीची विक्री त्वरित थांबवण्याची मागणी केली. त्याला मॉल व्यवस्थापनेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मनसेचे शहर सचिव ऍड.कौस्तुभ मोरे, विभाग अध्यक्ष अनिल कुरकुटे, उपविभाग अध्यक्ष अभिजित देसाई, स्वप्नील गाडगे, शाखा अध्यक्ष कुमार कोळी, सागर नाईकरे तसेच मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *